पुणे : कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी

पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून नागरिक येत असतात. गेल्या वर्षी करोनामुळे राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे यंदा या कार्यक्रमासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे म्हणाले, ‘अभिवादन कार्यक्रमासाठी यंदा आठ ते दहा लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांसोबत पूर्वतयारीच्या बैठका घेण्यात येत आहेत. अभिवादन कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पाडणे, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही प्रशासनासाठी प्राधान्याची बाब आहे. स्तंभ परिसरात पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या परिसरात कोणालाही सभा घेता येणार नाही.’

दरम्यान, यंदा जास्त नागरिक येणार असल्याचे गृहीत धरूनच स्तंभ परिसरात १७ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएमपीकडून शहराच्या विविध भागातून ३९० बसगाडय़ा या ठिकाणी सेवा देणार आहेत. येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी १३० टँकर आणि पुनर्वापर करता न येणारे दोन लाख ग्लास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबरोबरच १५० आरोग्य सेवक आणि कर्मचाऱ्यांसह १५ रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी महामार्गावर मोठे फलक लावण्यात येणार आहेत. कोरेगाव भीमा येथे यंदा तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक बदल पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून केले जाणार असून ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply