पुणे : कर्वे रस्त्यावर आणखी एक उड्डाणपूल ;मात्र प्रस्तावित उड्डाणपुलाला नागरिकांचा विरोध

पुणे : कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नळस्टॉप चौकात उड्डाणपूल बांधण्यात आल्यानंतर याच रस्त्यावर आणखी एक उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. करिष्मा चौक ते कर्वे पुतळा या दरम्यान वाय आकाराचा हा उड्डाणपूल असून त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलावर वेगवान वाहतूक आणि उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा बोजवारा असे चित्र असल्याने नवा उड्डाणपूल नको, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. करिष्मा चौक ते कर्वे पुतळा या दरम्यानची वाहूतक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी ७५ कोटींचा खर्च अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षांसाठीच्या अंदाजपत्रकामध्ये उड्डाणपुलासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका अंदाजपत्रकामध्ये उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आल्याने उड्डाणपूल बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच नव्या उड्डाणपुलाला विरोध सुरू झाला आहे. पौड फाटा ते कर्वे पुतळय़ावरून जाणाऱ्या इंग्रजी ‘वाय’ आकाराचा उड्डाणपूल नको. नळस्टॉप येथील उड्डाणपूल फसलेला असताना दुसरा उड्डाणपूल बांधून कोथरूडकरांच्या समस्यांत वाढ करू नका, अशी भूमिका कोथरूड नागरिक संघाने घेतली आहे. दिलीप नगरकर, संतोष पाटील, हर्षद अभ्यंकर, मंदार देसाई, जितेंद्र गोळसंगी, डॉ. शिशीर मोडक, वसंत बागल, केशव लोहोकरे, जगदीश परीकर, विश्वनाथ शेट्टी, अजय देशपांडे, बापू पोतदार, डॉ. जयंत मोनीकर, सुनील उन्हाळे यांच्यासह भागवत, कचरे, गांगुर्डे या नागिरकांनी त्याबाबतेच निवेदन दिले आहे. कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने दुमजली उड्डाणपूल बांधला आहे. मात्र उड्डाणपुलानंतरही नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कायम असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलावरून वेगवान वाहतूक आणि उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काही बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहेत. कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बांधलेला दुमजली उड्डाणपूलच फसला असल्याने नवा उड्डाणपूल नको असा दावा करत स्थानिक नागरिक नव्या उड्डाणपुलाविरोधात एकवटले आहेत.

रस्ता कमी अंतराचा असून कुठेही चौक नाही. मयूर कॉलनी ते करिष्मा चौकात वाहतूक कोंडी होत नाही. वाहतूक पोलीस नसतानाही वाहतूक सुरळीत असते. १९८७ च्या विकास आराखडय़ात मयूर कॉलनी डीपी रस्ता मंजूर असून तो अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कर्वे रस्त्याला तो सक्षम पर्याय ठरणार आहे. पौड फाटा ते कर्वे पुतळा या दरम्यान मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतुकीचा भार हलका होईल. सार्वजनिक वाहतूक वाढून मोटार आणि दुचाकीचा वापर कमी होईल. कर्वे रस्त्यावरून पौड फाटय़ाकडे मेट्रो आणि उड्डाणपुलामुळे पौड रस्त्याची वाहतूक ५० टक्के विभागली जाते. त्यामुळे २०१८ मध्ये नोंदविलेला वाहतुकीचा भार खूप कमी झाला आहे. कर्वे रस्ता विकसित होत असातना पर्यायी रस्ते आणि वाहनतळाचा विषय नीट हाताळण्यात आला नाही. मात्र त्याला उड्डाणपूल पर्याय ठरत नाही. वाहतूक परिणामकारक पद्धतीने हाताळून आणि तिचे योग्य पद्धतीने नियमन केल्यास डेक्कन जिमखान्यापासून वारज्यापर्यंत सुरळीत होऊ शकते.

शहरातील पहिला दुमजली उड्डाणपूल म्हणून गाजावाजा करीत उभारलेल्या कर्वे रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी आता काही प्रायोगिक बदल केले जाणार आहेत. त्यानुसार, म्हात्रे पुलाकडून येणाऱ्या चारचाकी वाहनांना शंकरराव जोशी रस्त्यावर बंदी घालण्यात येणार आहे. केवळ दुचाकींना परवानगी दिली जाणार आहे. या वाहनांना अभिनव चौकातून (नळस्टॉप) कर्वे रस्ता अथवा पौड रस्त्यावर जाता येईल. एसएनडीटी येथील एसटी आणि पीएमपीचा थांबा कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिराजवळ स्थलांतरीत करण्याचे नियोजित आहे. येथे रिक्षांना बंदी घालण्यात आली आहे. उड्डाणपुलावरून उतरताना पौड फाटय़ाकडील उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असेल तर नळस्टॉप चौाकातून कर्वे रस्त्याने आलेल्या वाहनांना डाव्या बाजूने पौड रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर जाता येईल. प्रायोगिक तत्त्वावरून बदलानंतर पुढील पंधरा दिवसांनंतर त्याबाबतच्या ठोस उपायोजना केल्या जाणार आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply