पुणे : उद्योजकांना त्रास देणाऱ्यांचे कंबरडे मोडा; गृहमंत्री फडणवीस यांचे पोलिसांना आदेश

पुणे : पुण्यासह राज्यात अनेक उद्योजक आपली गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. मात्र, काही बनावट माथाडी कामगारांचे नेते तयार झाले असून ते उद्योजकांना कंत्राटांसाठी त्रास देतात. अशा लोकांचे कंबरडे मोडा, असे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात सांगितले.  

पाषाण रस्त्यावरील पोलीस संशोधन केंद्रात शनिवारी वार्षिक गुन्हेगारी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना हे आदेश दिले. याचा उल्लेख त्यांनी शहराच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केला.वर्षभरापूर्वी एक उद्योजक राज्यात सहा हजार कोटींची गुंतवणूक घेऊन येणार होता. मात्र, राज्यातील एका मंत्र्याच्या माध्यमातून कंत्राटांसाठी त्या उद्योजकाला धमकावण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एकूणच वातावरण पाहून संबंधित उद्योजकाने त्याची सहा हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यास नकार देऊन कर्नाटकला जाणे पसंत केले. त्यामुळे उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. त्याकरिता त्रास देणारा कोणत्याही पक्षाचा, गटाचा, धर्माचा किंवा जातीचा असो, त्याची गय केली जाणार नाही. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई न केल्यास पोलिसांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला. 

उद्योगांना पोषक वातावरण तयार करणे राज्य सरकारची जबाबदारी असते. मुंबईनंतर पुणे राज्याचे दुसरे विकास केंद्र तयार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. उद्योगस्नेही वातावरण तयार करण्यासाठी उद्योगांबाबत राजकारण आणता कामा नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply