पुणे : अखेर भाजपला उपरती ; पुण्याच्या अवस्थेची जबाबदारी स्वीकारली ; चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणेकरांची दिलगिरी

पुणे : संपूर्ण शहर पावसामुळे सोमवारी पाण्यात गेल्यानंतर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, अशा शब्दात जबाबदारी टाळणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अखेर उपरती झाली. पुण्यात सतत मुसळधार पाऊस कोसळला. ही नैसर्गिक आपत्ती असली तरी नागरिकांना झालेल्या त्रासाची जबाबदारी पालकमंत्री म्हणून स्वीकारत आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्यामुळे ही जबाबदारी भाजपची आहेत, अशी स्पष्ट कबुली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त करतानाच अजित पवार यांनीही त्यावरून राजकारण करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

शहरात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शहराला बसला होता. शहराच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या काही तासांत झालेल्या पावसाने शहर अक्षरश: पाण्यात गेले होते. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने ही जबाबदारी भाजपची आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातील हे पाप आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी ही जबाबदारी टाळली होती. मात्र पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रथम या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारताना पुणेकरांची दिलगिरी व्यक्त केली.

ते म्हणाले, की पुण्यात काही तास सलग जोरदार पाऊस पडला. या नैसर्गिक आपत्तीचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागला. भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता होती. त्यामुळे ही जबाबदारी भाजपची आहे. पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी स्वीकारतो. रस्त्यांवरील खड्डे पूर्ववत न करता आल्याने ही परिस्थिती ओढावली. खड्डे नीट भरले नाहीत का, नालेसफाई नीट झाली नाही का, याची चौकशी केली जाईल. मात्र चौकशी करण्यापेक्षा किंवा दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा काय उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास केला जाईल. वाहतूक कोंडीबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे निधी मागितला जाईल.

नाले रुंद करणे, सीमाभिंत उभारणे आदी कामे केली जातील. त्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य शासनाकडे केली जाणार आहे. पुणे महापालिका, पीएमपी, स्मार्ट सिटी, पोलीस, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांच्याबरोबर येत्या ाकाही दिवसांत बैठका घेणार आहे. विरोधी पक्षांनी आसूड ओढताना आपल्याकडेही काही जबाबदारी असते, याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply