पिंपरी : फलक फाडण्याच्या वाढत्या प्रकारांची पालिकेकडून दखल; बेकायदा फलकांवर तत्काळ कारवाईचे आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. असे फलक फाडण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचा मुद्दा पोलिसांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्याची दखल घेत बेकायदा जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी बेकायदा फलक लावण्यात आलेले दिसून येते. असे फलक अज्ञातांकडून फाडण्यात येतात. गेल्याच आठवड्यात रातोरात काही फलक लावण्यात आले. दुसऱ्या दिवशी ते फाडण्यात आले होते. फलक फाडण्याच्या प्रकारांमुळे वाद निर्माण होतात. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे विविध प्रकारचे बेकायदा फलक काढून टाकण्याची कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र पिंपरी पोलीस ठाण्याकडून महापालिकेला देण्यात आले आहे. या पत्राची दखल महापालिकेने घेतली आहे. पालिका हद्दीत लावण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या बेकायदा फलकांवर तातडीने कारवाईचे आदेश आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शहर हद्दीत ठराविक चौकात महापालिकेच्या जागेत अभिनंदन, वाढदिवस, निधन, दशक्रिया व इतर जाहिरातींसाठी तात्पुरता परवाना दिला जातो. काहीजण परवानगी घेऊन फलक लावतात. मात्र, विनापरवाना फलक लावण्याचे प्रमाण जास्त आहे. असे बेकायदा फलक त्वरित काढण्यात यावेत व ते पुन्हा लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply