पिंपरी-चिंचवडमध्ये ८४ हजार; मतदारांच्या मूळ प्रभागांत बदल; अंतिम यादीतील प्रकारामुळे गोंधळाची स्थिती

पिंपरी: पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल ८४ हजार मतदारांचे मूळचे प्रभाग बदलले गेले आहेत, असे चित्र समोर आले. ही नावे आधी एका प्रभागात होती. अंतिम यादीत ही नावे नव्या प्रभागात समाविष्ट झाली आहेत. याद्यांचा बराच घोळ घालून झाल्यानंतर पिंपरी पालिकेने शनिवारी (२३ जुलै) अंतिम मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार, शहरातील एकूण मतदारसंख्या १४ लाख ८८ हजार ११४ इतकी झाली. नव्या मतदारसंख्येची नव्या स्वरूपात प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली असता, वाकडऐवजी रावेत-किवळे-मामुर्डी हा सर्वाधिक (५१, ९८९), मतदारसंख्या असणारा प्रभाग ठरला असून ताथवडेऐवजी थेरगावातील बापुजीबुवानगर प्रभागाची संख्या सर्वात कमी (२२,४१२) झाली आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी, वाकड, पिंपळे सौदागर प्रभागाची मतदारसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. शहरभरातील एकूण ८४ हजार १४६ मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर हरकती मागवण्यात आल्या होत्या, तेव्हा सर्वाधिक हरकती याच प्रकारातील होत्या. अनेकांची नावे मूळच्या प्रभागाऐवजी इतर प्रभागात गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. यासंदर्भातील दुरुस्त्या करण्यासाठी २३ जून ते १ जुलैपर्यंत मुदत होती. ९ जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, मतदार याद्यांचा घोळ न सुटल्याने सुरुवातीला १६ जुलैपर्यंत आणि नंतर २१ जुलैपर्यंत अंतिम मतदार यादीसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही हा याद्यांचा घोळ सुरूच होता. अखेर, महापालिकेने १४ लाख ८८ हजार मतदारांची नावे असणारी अंतिम मतदार यादी २३ जुलैला जाहीर केली. याद्यांमधील बऱ्याच तक्रारी दूर करण्यात आल्याचा दावा निवडणूक विभागाने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडील विधानसभानिहाय यादीप्रमाणे अंतिम मतदार यादी केल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply