गृहमंत्री घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; भोंग्यांबाबत चर्चेची शक्यता

मुंबई: राज्यात भोंग्यांचं राजकारण जोरदार सुरु आहे. मशीदीवरील भोंग्यांवरुन राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात भोंग्याचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र याचा परिणाम राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर होत आहे. आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ही भेट होणार आहे. या बैठकीत भोंग्याबाबत आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची असणार आहे. 

राज्यात भोंग्यावरुन राजकारण पेटलं असताना या राजकारणाचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत मशीदींवरील भोंग्याबाबत भूमिका घेतली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या भूमिकेला भाजपचंही समर्थन आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी तर मंदिरांसाठी मोफत भोंगेवाटप केले. 

भोंग्याच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध मनसे आणि भाजप एकवटले आहे. यामुळे राजकारण तापलं आहे. काही मालेगावंमधील मौलवींनी तर मशीदींवरील भोंगे उतरवण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये सर्वच प्रार्थनास्थळावर भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ३ मे पर्यंत मशीदच नव्हे, तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या  भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यानंतर जर ३ मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकाविषयी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे.

एकूणच पाहता राज्यातील भोंग्यांच्या राजकारणावरुन राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक शांतात अबाधित रहावी यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply