औरंगाबाद :  नवरात्रीत भगरीचे विघ्न, औरंगाबादमध्ये 500 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा

औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त उपवासासाठी खरेदी केलेल्या भगर आणि भगरीच्या पिठातून विषबाधेचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनासह पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, वैजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात भगर खाल्ल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना विषबाधा झाली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या वैजापूर तालुक्यात 118 जणांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड, गंगापूर तालुक्यात देखील अनेकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. सुरवातीला औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील 13 नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यानंतर त्याच गावात आणखी 12 जणांना विषबाधा झाली. वैजापूर तालुक्यातील 118 जणांना विषबाधा झाली तर कन्नड तालुक्यातील 12 जणांना विषबाधा झाली आहे.

या विषबाधेमुळे ग्रामीण भागातील शासकीय तसेच अनेक खासगी रुग्णालये फुल झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी फिरस्ती विक्रेत्यांकडून भगरचे पीठ घेतल्याने अशा घटना घडल्याची शक्यता अन्न व औषध प्रशासनाने वर्तवली आहे. तसेच नागरिकांनी कुठलेही अन्न पदार्थ विकत घेताना ते पॅकबंद असलेले पदार्थ परवानाधारक विक्रेत्यांकडून विकत घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या सर्व प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. त्यांनी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत आणले असून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नवरात्र सुरू होताच झालेल्या या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply