औरंगाबाद : ‘एसटीपी’च्या पाण्याचा होणार फेरवापर

औरंगाबाद : महापालिकेने भूमिगत गटार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट (सिवरेज ट्रिटमेंट प्लांट) सुरू केले आहेत. या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दररोज किमान ७० एमएलडी पाणी वाया जात आहे. या पाण्याचा वापर करण्यासाठी आता महापालिकेनेच पुढाकार घेतला आहे. पडेगाव येथील एसटीपीचे पाणी सफारी पार्कसाठी तर कांचनवाडी येथील एसटीपीचे पाणी पाईपव्दारे शहरात आणून बांधकामांसह इतर कामांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. १६) सांगितले. महापालिकेने ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कांचनवाडी, पडेगाव व झाल्डा फाटा येथे एसटीपी प्लांट सुरू केले आहेत. यातील सर्वाधिक मोठा प्लांट १६१ एमलडीचा कांचनवाडी येथील आहे. तसेच झाल्टा फाटा येथील ३५ तर पडेगाव येथील प्रकल्प १० एमएलडी क्षमतेचा आहे. सध्या कांचनवाडी येथे ६० ते ७०, झाल्डा फाटा येथे सहा ते सात तर पडेगाव येथे दोन एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र या पाण्याचा वापर होत नाही. हे पाणी सर्रास नदीपात्रात सोडले जात आहे. दरम्यान प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसी, डीएमआयसी, बांधकाम व्यावासायिक, वीटभट्टी चालकांनी वापरावे यासाठी महापालिकेने प्रयत्न केले. पण समृद्धी महामार्ग वगळता इतरांनी प्रतिसाद दिला नाही. आता महापालिकेनेच या पाण्याचा वापर करण्या निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रशासक श्री. पांडेय यांनी सांगितले की, पडेगाव येथील प्लांट सफारी पार्कच्या जवळ आहे. त्यामुळे येथील पाण्याचा वापर सफारीपार्कसाठी केला जाणार आहे. त्यासंदर्भात उपाय-योजना करण्याची जबाबदारी नगर रचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात उपलब्ध करून देणार प्रक्रियायुक्त पाणी नागरिकांना सध्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे तर दुसरीकडे कांचनवाडी येथील एसटीपी प्रकल्पातून ५० ते ६० एमएलडी पाणी दररोज वाया जाते. अनेक नागरिक नळाच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, बागकाम, गाड्या धुण्यासाठी व इतर कारणासाठी करतात. त्यांना एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी मिळाले तर नळाच्या पाण्याची बचत होईल. त्यामुळे कांचनवाडी येथील प्रकल्पातून पाइपलाइन करून हे पाणी शहरातील काही पॉइंटवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply