आजीबाईंनी भरविला होळीच्या दिवशी गरजूंना गोडाचा घास !

पुणे - मंगळवार पेठेतील नानुबाई मंडळी या ६५ वर्षांच्या आजींनी आगळा वेगळा उपक्रम राबविला. घरोघरी फिरून होळीत टाकल्या जाणाऱ्या पुरणपोळ्या गोळा केल्या आणि त्यांची राख न करता भुकेलेल्यांचा जठराग्नी शांत करून त्यांचाही सण गोड केला. होळीच्या दिवशी अग्नीत नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्याची परंपरा आहे. परंतु, नानुबाई या गेल्या सहा वर्षांपासून या बाबत नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. मंगळरवार पेठेतील इंदिरानगर ते पारगे चौका दरम्यान पेटविण्यात येणाऱ्या होळीच्या परिसरात त्या सायंकाळी फिरतात. नागरिकांना पुरणपोळी अग्नीत न टाकण्याची विनंती करतात आणि त्यांच्याकडून घेतलेल्या पुरणपोळ्या त्या एका टोपलीत गोळा करतात. या पोळ्या मालधक्का ते ससून येथील गरजूंना अन्नदान करतात. नैवेद्य म्हणून दाखवा पण अग्नीत टाकू नका, अशी विनंती नानुबाईंनी नागरिकांना केली. स्वतः फिरून सुमार १०० ते ११० पुरणपोळ्या गोळ्या केल्या होत्या. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. गरजूंना देखील सण उत्साहाचा आनंद घेण्यात यावा, असे त्यांना वाटते. महापालिकेच्या स्वच्छता विभागातून त्या निवृत्त झाल्या. रस्त्यांवर झाडू मारण्याचे सुमारे २४ वर्षे त्यांनी काम केले. ‘समाजासाठी फार काही करता आले नाही तरी, गरीबांचे सणाच्या दिवशी तोंड गोड करता येते, त्याचेच समाधान आहे,’ अशी नानूबाईंची भावना आहे. अन त्यासाठीच दरवर्षी नव्या उमेदीने त्या पुरणपोळ्या गोळा करण्याचा उपक्रम राबवितात आणि गरजूंचा सण साजरा करतात. अंनिसकडून १५०० पोळ्यांचे वाटप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्वाभिमानी संघटना यांच्यातर्फे होळीच्या दिवशी ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यातून गोळा झालेल्या १५०० पोळ्यांचे वाटप पुणे स्टेशन आणि सिंहगड रस्ता परिसरात करण्यात आले. समिती गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. होळीमध्ये पोळी न टाकता ती आम्हाला द्या, आम्ही ती भुकेलेल्यांना दान करू. पोळीची राख करण्यापेक्षा भुकेलेल्यांच्या पोटात अन्न जाऊ द्या, असे म्हणत वसंत कदम, हसन बारटक्के, अनुराधा काळे, अनिल वेल्हाळ, सविता म्हेत्रे चेतन झेंडे आदी कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply