अंधेरी निवडणूक: “ही राज्याची परंपरा जपण्याची वेळ होती, त्याला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला ”; भाजपाच्या निर्णयानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याची संस्कृती आणि परंपरा जपण्याची ही वेळ होती. त्याला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

“रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरीच्या जागेवर ही पोटनिवडणूक होणार होती. अशा पोटनिवडणुका या बिनविरोध व्हाव्या, अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पंरपरेची आठवण करून दिली. राज ठाकरे यांनीही पत्र दिले होते. उद्धव ठाकरेंनीही या परंपरेची भाजपाला आठवण करून दिली होती. त्यामुळे राज्याची संस्कृती आणि परंपरा जपण्याची ही वेळ होती. त्याला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.

दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला होता. आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भात निर्णय घेत निडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply