वाहतूक पोलिसांनाच आता पोलिस उपायुक्तांनी लावला ‘जॅमर’!

पुणे - सिग्नलला थांबून नियमांचे पालन करणाऱ्या, तर कधी सिग्नल सुटल्यानंतर धावत जाऊन वाहनचालकांना (Vehicle Driver) अडवून कारवाई (Crime) करणाऱ्या, तसेच कोपऱ्या-कोपऱ्यात घोळक्‍याने उभे राहून सावज टिपणाऱ्या वाहतूक पोलिसांना (Traffic Police) आता वाहतूक पोलिस उपायुक्तांनीच (Traffic Deputy Commissioner) थेट इशारा (Warning) दिला आहे. नागरिकांना कोंडीत पकडून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी वाहतूक नियमन करण्यास प्राधान्य द्यायचे आहे, रहदारी नसेल त्याच वेळेला शिस्तीत व नियमानुसार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, वाहनचालकांशी सौजन्यानेच वागावे, अशी सक्त ताकीद पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी वाहतूक पोलिसांना दिली आहे. शहरातील वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईची व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. संबंधित वृत्त वाचून दोनशे ते तीनशेहून अधिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कारवाईबद्दल त्यांना आलेले अनुभव, तक्रारी ‘सकाळ’कडे मांडल्या. या तक्रारींचीही गांभीर्याने दखल घेत, वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीची सद्यःस्थिती मांडण्यात आली. दरम्यान, संबंधित वृत्त, नागरिकांच्या तक्रारी याची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी गांभीर्याने दखल घेतली. वाहतूक पोलिसांना संबंधित प्रकार तत्काळ थांबवून पोलिसांना सक्त ताकीद दिले. तसेच कोणत्याही स्वरूपाचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, वाहतूक पोलिसांकडून गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. दोनपेक्षा जास्त पोलिस चौकात थांबणार नाही शहरातील महत्त्वाच्या चौकातच दोनपेक्षा जास्त पोलिस कर्मचारी असतील. त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी दोनपेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांनी चौकांमध्ये थांबू नये. प्रत्येकाने वाहतूक सुरळीत राहील, वाहतुकीचे व्यवस्थित नियमन होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. रहदारी कमी होईल, वाहतुकीचा ताण कमी असेल, त्याचवेळी पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. सिग्नलवरील कारवाई बंद करा सिग्नल सुरू असताना वाहनांच्या गर्दीत घुसून दुचाकींच्या चाव्या काढून त्या बाजूला घेणे किंवा सिग्नल सुटल्यानंतर धावत जाऊन एखाद्या दुचाकीस्वाराला बाजूला काढण्यासारखे गंभीर प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचेही पोलिस उपायुक्त श्रीरामे यांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे अपघात होऊन वाहनचालक किंवा पोलिस कर्मचाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रहदारीच्यावेळी वाहतूक नियमनाला प्राधान्य द्यावे. सिग्नलला अडथळा येणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही, याची पुरेपुर खबरदारी घ्यावी, असेही श्रीरामे यांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक पोलिसांना रहदारीच्या वेळी वाहतूक नियमनावर लक्ष देण्यास सांगितले आहे. दुपारच्यावेळी उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. ‘टोइंग व्हॅन’वरील कामगारांचीही चारित्र्य पडताळणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, कोणत्याही प्रकारचे वाद टाळावेत, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिसांना सूचना केल्यानंतरही त्यांनी त्याचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. - राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply