रेशन दुकानदारांना ऑनलाइन चलन भरण्याची सुविधा

पुणे : रेशन दुकानदारांना धान्य खरेदीसाठी चलनाचे पैसे भरण्यासाठी परिमंडळ कार्यालयात जावे लागते. त्यानंतर कार्यालयातून घेतलेली चलनाची प्रत बँकेत भरणा करावी लागते. या प्रक्रियेसाठी रेशन दुकानदारांना दर महिन्याला दोन दिवसांचा वेळ खर्ची घालावा लागतो. परंतु आता धान्य खरेदीसाठी ऑनलाइन चलन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे रेशन दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी पुणे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयासह त्याअंतर्गत येणारी ११ परिमंडळ कार्यालयांना चलन ऑनलाइन पद्धतीने भरली जावीत, असे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया परिमंडळ ‘ह’ आणि ‘म’ कार्यालयात राबविण्यात आली. परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांनी १११ रेशन दुकानांपैकी १०९ रेशन दुकानांचे चलन ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले. या कार्यपद्धतीचे रेशन दुकान संघटनांनी स्वागत केले आहे. दर महिन्याला रेशन दुकानदारांच्या मागणीनुसार ऑनलाइन चलन किती भरावे लागेल, याबाबत त्यांना मोबाइलवर मेसेज पाठविण्यात येईल. त्यामुळे या कामासाठी दुकानदारांना कार्यालयात जावे लागणार नाही. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून कामकाजात पारदर्शकता आणण्यात येत आहे. रेशन दुकानदारांच्या सोयीसाठी ही उपाययोजना केली आहे. - सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर अतिशय स्वागतार्ह अशी ही कार्यपद्धती आहे. सर्व रेशन दुकानदारांकडून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. वेळेचा अपव्यय टाळला जाऊन अधिक पारदर्शकता आणली जाईल, याची खात्री आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना चलन भरण्यासाठी बँकेत तासनतास रांग लावावी लागणार नाही. - गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply