मुंबई : रेवस-सिंधुदुर्ग सागरी महामार्गाला मान्यता

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुचर्चित रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक सुसाट होणार आहे. विशेष म्हणजे सागरी महामार्ग प्रकल्पाला गती मिळावी म्हणून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यात आले आहे.

रेवस-रेडी महामार्गाची कल्पना दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी मांडली होती. त्यानंतर काही प्रमाणात या कामाला गतीही आली होती; मात्र निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता. ४९८ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी १० हजार कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. १६ मार्चला या महामार्गाला अंतिम मान्यता मिळाली असून, तो चार पॅकेजमध्ये बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग समुद्र किनाऱ्याजवळून जाणार आहे. यामुळे याचा फायदा येथील पर्यटनास होणार आहे.

महामार्गामुळे कोकणाचा जलदगतीने विकास देखील होणार आहे. कोकणातील प्रसिद्ध आंबे, काजू, नारळ, सुपारी यांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. यामुळेच हा महामार्ग कोकणवायींसाठी फक्त महामार्ग नसून सोन्याचा रस्ताच ठरेल, असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे रेवस ते रेड्डी मार्गावरील केळसी खाडीवरील पुलासाठी १४८ कोटी रुपयांचा निधी जवळपास मंजूर करण्यात आला आहे. महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. मुंबईकरांना थेट गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरू शकेल, असा हा सागरी महामार्ग आहे. या संकल्पनेतूनच महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. रेवस ते रेड्डी यादरम्यान किनाऱ्यालगतची शहरे मुख्य रस्त्याशी जोडली जाणार आहेत; तर मुंबई ते गोवा हे अंतरही कमी होणार आहे. हा सर्व मार्ग समुद्र किनाऱ्यालगत निसर्गाच्या सान्निध्यातून जात असल्याने पर्यटकांच्या पसंतीस उतरणारा ठरेल. कोकणातील नागरिकांना सागरी महामार्ग हा आपुलकीचा विषय आहे. यामुळे येथील पर्यटन, मासेमारी उद्योगालाही चालना मिळणार आहे.

...हे आहेत महामार्गाचे टप्पे

  • द्रोणागिरी ते मुरूड - ८० किलोमीटर
  • मुरूड ते बाणकोट - ६४ किलोमीटर
  • बाणकोट ते रत्नागिरी - १४६ किलोमीटर
  • रत्नागिरी ते पावस - २० किलोमीटर
  • पावस ते खाक्षीतिठा - ६९ किलोमीटर
  • खाक्षीतिठा ते मालवण - ५० किलोमीटर
  • मालवण ते गोवा ६५ किलोमीटर



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *