पुणे : ‘नोंदणी व मुद्रांक शुल्क’चा पुन्हा सर्व्हर डाउन

पुणे : येत्या एक एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू होणार असल्यामुळे मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु सोमवारी सकाळपासून सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक नागरिकांना दस्त नोंदणी न करताच घरी परतावे लागले. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

दस्त नोंदणीसाठी सध्या पाच टक्के मुद्रांक शुल्क तसेच एक टक्का सेस भरावा लागतो. त्यात आणखी एक टक्का मेट्रो अधिभार लागू झाल्यास सात टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. परंतु ३१ मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत कधीही दस्त नोंदणी केल्यास मेट्रो अधिभार लागू होणार नाही. त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालयांमधील सर्व्हर स्लो होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या मार्चअखेरमुळे दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सोमवारी सकाळीच सर्व्हर डाउन झाले. हा तांत्रिक बिघाड दुपारपर्यंत दुरुस्त न झाल्यामुळे अनेकांची दस्त नोंदणी होऊ शकली नाही. तसेच, मागील आठवड्यातच दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १०, ११ आणि २३ या कार्यालयांची वीज जोडणी तोडण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण दिवस कार्यालयीन कामकाज होऊ शकले नव्हते.

दुय्यम निबंधक कार्यालयात सकाळपासून सर्व्हर डाउनमुळे दस्त नोंदणी झाली नाही. या कार्यालयात नागरिकांना साधे बसण्याची सुविधा नाही. त्यामुळे तीन ते चार तास पायऱ्यावर ताटकळत बसून राहावे लागले. सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांना किमान सुविधा द्याव्यात.

- संतोष जोशी, व्यावसायिक, पुणे

सर्व्हर स्लो झाल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांच्या दैनंदिन वेळेत दोन तासांनी वाढ केली आहे. यापूर्वी शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू ठेवण्याचे निर्देश दुय्यम निबंधक कार्यालयांना दिले होते. सर्व्हर डाउनबाबत वरिष्ठ पातळीवर मार्ग काढण्यात येत आहे.

- अनिल पारखे, सह जिल्हा निबंधक, नोंदणी व मुद्रांक शुल्क

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांतील यंत्रणा ढिसाळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत असते. नागरिकांकडून अवाढव्य नोंदणी शुल्क आकारूनही योग्य कार्यप्रणाली कार्यरत नाही. त्यावर तोडगा न काढल्यास भविष्यात नागरिकांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागेल.

- ॲड. विशाल ओव्हळ

वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाउनमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शहरात मेट्रोची कामे पूर्ण होण्यापूर्वीच सर्व पुणेकरांना मुद्रांक शुल्कामध्ये मेट्रो अधिभार लागू करण्यात आला आहे, ही बाब अन्यायकारक आहे.

- ॲड. अमोल काजळे पाटील



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply