मुक्तछंद:जयश्री आलूरकरांच्या कथासंग्रहातले माणूसपणाचे झरे; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये…!

मानसी वैद्य। कवयित्री4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण नुकताच महिला दिन साजरा केला. त्यानिमित्तानं खूप काळ प्रसिद्धीपासून काहीशा दूर राहिलेल्या एका स्त्री लेखिकेच्या कथासंग्रहाबद्दल!

सोलापूरच्या साहित्यविश्‍वात कथा-लघुकथांसाठी ज्यांचं नाव फार आदरानं घेतलं जातं, त्या जयश्री आलूरकर! मी त्यांना कधीही भेटू शकले नाही, पण त्यांच्या कथांचा त्यांच्या पश्चात नुकताच आलेला हा संग्रह आणि लेखनातून का होईना आमची भेट झाली. पेशानं शिक्षिका असलेल्या आलूरकरबाईंनी ललना, वाङ्मयशोभा, दीपलक्ष्मी, संचार, विश्व समाचार इत्यादींमधून जवळपास 100 कथा लिहिल्या . शिवाय एक कादंबरी. पण तरीही त्या नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिल्या. साधारण 40 वर्ष जुना काळ उलगडणारा 20 कथांचा कथांजली हा त्यांचा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला.

मला आवडलेल्या काही कथांबद्दल सांगायचं, तर ‘तुकयाचे अभंग’ ही मला विशेष आवडलेली कथा. लहानगा तुकाराम, आई-वडिलांनी गरिबी असूनही शाळेत धाडलेला. बाईंकडून संत तुकारामांबद्दल नि त्यांच्या अभंगांबद्दल ऐकतो. अभंग म्हणजे कधीच भंग न पावणारं, असं ऐकून आपणही काहीतरी टिकून राहील असं, नष्ट न होणारं निखळ लिहावं असं वाटणारा छोटा तुकाराम, जेव्हा स्वतःच्या मनातल्या इच्छांची यादी आठवायला लागतो, तेव्हा मात्र त्याला गरिबीशी झगडणारे त्याचे आई-वडीलच आठवत राहतात. मग अभंग लिहिण्याच्या वही ऐवजी तो फार वेगळं काहीतरी घेतो. त्याच्या मायेनं भरलेल्या त्या कृतीइतकं ‘अभंग’ खरोखर दुसरं काय आहे? असंच वाचकाला वाटत राहतं.

‘हॅम्लेट आणि ऑथेल्लो’मधे दोन मैत्रिणींच्या आयुष्यात विचाररहित कृती आणि कृतीरहित विचार यामुळे घडलेली, सगळं बदलून टाकणारी उलथापालथ आणि तिचा त्या दोघींच्याही आयुष्यावर झालेला दूरगामी परिणाम मांडलेला आहे. या दोन मैत्रिणींच्या आयुष्याला बदलून टाकू शकणारे ‘जर-तर’ लेखिका वाचकांना दिसू देतात, कळू देतात, पण कथा संपते ती मात्र हे सगळं फार न खेचता आणि वाचकांना गोष्टीमधलं कारुण्य फक्त जाणवत राहतं.

‘आणि बाल्य गवसले’मधल्या शिक्षिकेला नव्याने बालवाडी शाळेत आलेला एक मुलगा संदीप इतरांहून वेगळाच, अकाली मोठा वाटत असतो. त्यामुळेच त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत घडलेली दुर्घटना समजून घेऊन, त्याच्या आई-वडिलांशी बोलल्यानंतरही त्याला पूर्णतः स्वीकारणं त्यांना जमत नसतं. कथेच्या शेवटी मात्र एक तरल लोभस प्रसंग येतो. आपल्या स्वतःवर विनोद करूनही समोरच्याला हसवू पाहणं, हे एका निरागस भाबडेपणाशिवाय जमत नाही. आणि तोच भाबडेपणा लहानग्या मेघाला हसवू पाहणाऱ्या संदीपच्या डोळ्यांत शिक्षिका पाहतात आणि त्यांच्या मनाचे सगळे बांध तुटून मायेचा प्रवाह त्या भाबड्या मुलाकरता त्यांच्या मनात वाहू लागतो!

कितीतरी सुंदर कथा आहेत. काहींमध्ये लेखिका एका त्रयस्थाच्या भूमिकेतून गोष्ट सांगतात तर काहींमध्ये स्वतःलाच त्या पात्राच्या जागी ठेवून. काही कथा प्रसंग उलगडतात, तर काही कालखंड. ‘एक होकार एक नकार’ सारखे मोजके अपवाद वगळता बहुतांश कथांमधून मला जाणवला तो कारुण्यभाव.

माणूस समोरच्याचं दुःख न अनुभवताही समजून घेतो, घेऊ शकतो. समोरच्या त्रासानं तो त्रस्त होतो आणि त्याच्या अश्रूंनी व्यथित होतो. ह्यातच त्याच्या माणूसपणाचे झरे लपलेले असतात आणि ते तेव्हाच मोकळेपणाने वाहतात. जेव्हा माणसाला करुणेचा अर्थ उमगलेला असतो. या कथांमधली पात्र काही जगावेगळी नाहीत. त्यांचे प्रश्नही जगावेगळे नाहीत. पण त्यांचं तसं नसणं हेच या कथांचं एक बलस्थान आहे. समाजातल्या साध्यासुध्या आणि नेहमीच्या भासणाऱ्या घटनांवरती नेमकं भाष्य करणाऱ्या सकस आणि दर्जेदार कथांचा हा अतिशय वाचनीय असा संग्रह आहे.

संबंधित कॉलमचे इतर भाग

मुक्तछंद:मामाचा गाव, चिंचेच्या झाडाला बांधलेला झोका अन् पिंपळाचा पार; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये धुंद नाती गंधावणारी!

मुक्तछंद:सगळं इथंच, असंच आणि इतकंच सुंदर, पण पाहतो का आपण?; वाचा मानसी वैद्य यांचा हुरहुर लावणारा कॉलम!

मुक्तछंद:कविता न सुचलेले दिवस, उजळण्यामागचं जळणं आणि दोन कोवळी पानं फुटावित असं दान मागणारं दासूंचं 'तथापि'...!

मुक्तछंद:अंतिम क्षणी थोडे रंग आणि 'हायकू' घेऊन येणारा चंद्र; वाचा मानसी वैद्य यांच्या कॉलममध्ये...!

मानसी वैद्य यांचा कॉलम:जग जरी इतकं मोठं, हसू त्यात मावणार नाही...'मुक्तछंद' हे नवंकोरं सदर, वाचायला विसरू नका!



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *