एन. रघुरामन यांचा कॉलम:यशासाठी प्रत्येक वर्कप्लेसची एक अनोखी संस्कृती असायला हवी

महान मॅनेजमेंट तज्ज्ञ पीटर ड्रकर यांनी म्हटले होते की, ‘कल्चर ईट्स स्ट्रॅटेजी फॉर ब्रेकफास्ट.’ म्हणजेच, कोणत्याही संस्थेची संस्कृती—तिथल्या मान्यता, वर्तन आणि मूल्ये—ही कोणत्याही धोरणात्मक योजनेपेक्षा जास्त शक्तिशाली असते. जर संस्कृती विषारी किंवा असंतुलित असेल, तर ती चांगल्यातली चांगली रणनीतीही अपयशी ठरवते. कारण कर्मचारी त्यात प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. जर तुमच्याकडे ड्रकर यांचे पुस्तक वाचायला वेळ नसेल, तर अलीकडेच झालेला टी-20 क्रिकेट सामना तुम्हाला ही गोष्ट तितक्याच वेगाने समजावून सांगेल. चांगली संस्कृती कशी चमत्कार घडवू शकते, हे रविवारच्या सामन्यावरून समजून घेऊया. लक्षात ठेवा, प्रतिभा सामना जिंकून देते, पण संस्कृती चॅम्पियनशिप जिंकून देते. 1. जेव्हा सर्वस्व पणाला लागते, तेव्हा कर्मचाऱ्यांना कामगिरी करावीच लागते: गेल्या तीन बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांमधील संजू सॅमसनची धावसंख्या पाहा. वेस्ट इंडिजविरुद्ध 50 चेंडूत नाबाद 97, इंग्लंडविरुद्ध 42 चेंडूत 89 आणि न्यूझीलंडविरुद्ध 46 चेंडूत 89 धावा. तिन्ही सामन्यांत तो खडकासारखा उभा राहिला आणि अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. अभिषेक शर्माने केवळ 18 चेंडूत अर्धशतकच झळकावले नाही तर एक बळीही घेतला. ईशान किशन आणि शिवम दुबे यांनीही असेच योगदान दिले. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने चार आणि अक्षर पटेलने तीन बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. हे सर्व घडू शकले कारण या सर्वांना माहित होते की, प्रतिभेमुळे ते क्रीझपर्यंत पोहोचू शकतात, पण त्यांचा संयमच ते तिथे टिकणार की नाही हे ठरवेल. अगदी तसेच, आपण आपल्या कौशल्याने नोकरी तर मिळवतो, पण तिथली संस्कृती आणि आपली वैयक्तिक मानसिकता आपण यशस्वी होणार की नाही हे ठरवते. 2. आश्वासक संस्कृतीतच प्रतिभा बहरते: सॅमसनने कबूल केले की, “मला वरिष्ठ खेळाडूंकडून, विशेषत ः सचिन तेंडुलकर सरांकडून खूप मार्गदर्शन आणि सल्ले मिळाले.” फायनलच्या दिवशीही सचिनने सॅमसनला फोन करून तो कसा अनुभवत आहे, याची विचारपूस केली. ‘मेंटर’ (मार्गदर्शक) हे केवळ एक पद नसते; जर तुम्हाला तुमची कंपनी मोठे यश मिळवेल असे वाटत असेल, तर मेंटर म्हणून कर्मचाऱ्याचा स्वीकार एखाद्या मुलाप्रमाणे करावा लागतो. त्याच्या चुका माफ करणे, त्याचे धाडस वाढवणे आणि त्याला उत्तम कामगिरीसाठी प्रेरित करणे आवश्यक असते. अभिषेक आणि ईशान हीदेखील अशाच मेंटरशिपची उदाहरणे आहेत. 3. प्रगतीची भूक: अंतिम सामने थरारक मानले जातात, पण रविवारचा सामना एकतर्फी झाला. का? कारण भारतीय संघाचा उत्साह न्यूझीलंडच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता. भारतीय खेळाडूंना माहित होते की न्यूझीलंड पूर्ण 20 षटके खेळले तरी 200 धावांपर्यंत पोहोचणार नाही, तरीही त्यांनी त्यांना 19 षटकांतच गुंडाळले. दुसऱ्या डावात स्पष्ट दिसत होते की, भारतीय संघाला लवकरात लवकर विश्वचषक उंचावायचा होता, मग त्यात थोडा धोका का असेना. 4. संस्कृती अंधश्रद्धेला हरवते: आपल्यापैकी अनेकांना जशा अंधश्रद्धा असतात, तसेच अहमदाबादच्या मैदानाशीही ‘पनौती’सारखे कलंक जोडले गेले होते. या मैदानाबाबत सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले होते, कारण या मैदानाच्या काही दुःखद आठवणी होत्या. अशा परिस्थितीत दडपण केवळ जिंकण्याचेच नव्हते, तर त्या जुन्या आठवणी पुसून नवीन आठवणी निर्माण करण्याचेही होते. कोणी आपल्या कर्णधाराला अंधश्रद्धाळू म्हणू शकते—आठवा जेव्हा सूर्यकुमार यादवने खेळपट्टीची माती कपाळाला लावली होती? पण ती अंधश्रद्धा नव्हती, तर ‘हे मैदान आमचे आहे’ अशी त्याने स्वतःला आणि संघाला दिलेली ती एक ग्वाही होती. ‘दैनिक भास्कर’ समूहामधील आमची संस्कृतीदेखील यशाच्या इतिहासाला वारसा बनवण्याची आणि प्रत्येक विभाग अव्वल स्थानी राहील याची खात्री करण्याची राहिली आहे. फंडा असा की - जर तुम्ही एखाद्या संस्कृतीचा स्वीकार केला आणि त्यावर विश्वास ठेवला, तर तीच संस्कृती अंधश्रद्धेला ताकदीत, मीम्सना आठवणीत आणि वेदनेला अभिमानात बदलू शकते. यशासाठी व्यवस्थापनाला हीच संस्कृती कंपनीच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजवावी लागते.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *