Vitthal Rukmini Mandir Prasad : विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; हिवाळी अधिवेशनात लेखापरीक्षण अहवाल सादर

Vitthal Rukmini Mandir Prasad : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा लाडू प्रसाद हा निकृष्ट असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. साल २०२१-२०२२ या वर्षामध्ये एका महिला बचत गटाला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले होते. या बचत गटाकडून निकृष्ट पद्धतीने लाडू प्रसाद तयार करण्यात आला होता. असा लेखापरीक्षण अहवाल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला आहे.

स्वच्छता न राखणे, लाडूची पॅकिंग व्यवस्थित न करणे असा ठपका अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे. सध्या मंदिर समिती स्वतः लाडू प्रसाद तयार करून त्याची विक्री करते. निकृष्ट दर्जाचा लाडू बनवणाऱ्या व्यक्तींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

Political News : "आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार, त्यांचा पासपोर्ट जप्त करा", भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

पंढरीला  येणारा प्रत्येक वारकरी विठुरायाच्या चरणी आशिर्वाद घेतल्यावर प्रसादाचा लाडू घेत असतो. हा लाडू विठुरायाचा  प्रसाद आणि आशिर्वाद आहे, असं भाविक समजतात आणि श्रद्धेने लाडू खातात. मात्र प्रसादाच्या लाडूमुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं लेखापरीक्षण अहवालात म्हटलं आहे. सध्या नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा एक वर्षाचा (२०२०-२१) लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. त्यावेळी ही माहिती समोर आलीये.

ज्या ठिकणी लाडू बनवला जातोय ती जागा फार अस्वच्छ आहे. लाडूची बुंदी सुकवण्यासाठी कळकटलेली ताडपत्री वापरली जातेय. लाडूच्या पाकिटावर जे घटक असल्याचं लिहिलं जातं ते प्रत्यक्षात त्यात वापरले जात नाहीत. शिवाय प्रसाद म्हणून एका पाकीटात तीन लाडू भरले जातात आणि २० रुपयांना विकले जातात. या लेखापरीक्षण अहवालामध्ये लाडू प्रसाद पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून पुरेसा व चांगल्या गुणवत्तेचा लाडू प्रसाद न देणे, शेंगदाणा तेला ऐवजी सरकी तेलाचा वापर करणे, पुरेशा प्रमाणात ड्रयफू्टस न वापरणे, स्वच्छता न ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्याचे लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.‌

लाडू खाल्यावर भाविकांच्या आरोग्यावर याचा काही परिणाम झाल्यास त्याला लाडू बनवणाऱ्या बचत गट जबाबदार राहिल. तसेच मंदिर समितीचीसुद्धा यात तेवढीच जबाबदारी असेल, असा इशारा लेखापरीक्षण करणाऱ्या पुण्याच्या ‘बीएसजी अँड असोसिएट्स’ने नोंदवला आहे.

सध्या मंदिर समितीमार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply