Satara : पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र

Satara : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता वयाचे भान ठेवून बोललं पाहिजे. मकरंद पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदींना ते गद्दार म्हणतात. पण ते गद्दार नाहीत तर सर्व जनतेचे हक्कदार आहेत. मागील साठ वर्षांत शरद पवार यांनी काँग्रेसच्या मदतीने फक्त घोषणांची तुतारी वाजवली आहे. महायुतीचे उमेदवार पाडा म्हणणाऱ्या शरद पवारांचेच उमेदवार आता मतदार पाडतील आणि महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून देतील असे खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई येथील (अजित पवार) पक्षाचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचार सभेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत उदयनराजे बोलत होते. सभेत प्रतापराव पवार, नितीन भरगुडे पाटील, अशोक गायकवाड, विक्रम वाघ, प्रमोद शिंदे आदींची भाषणे झाली. सभेपूर्वी शहरात मोठी प्रचार फेरी निघाली होती. सभेला आणि प्रचार फेरीला मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या.

वयाचे भान सोडून ते काय बोलणार असतील तर त्यांना आता जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे सांगत उदयनराजे म्हणाले, की ज्येष्ठ नेत्यांचा आपण वयाचा मान ठेवून आदर करतो. मात्र त्यांनीही आपल्या वयाचे भान ठेवायचे असते. ज्या लोकांच्या जीवावर यांनी स्वत:चे राजकारण केले त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर लगेच त्यांना पाडा, गद्दार असे बोलत सुटणे हे तोल सुटल्याचे लक्षण आहे. ही प्रत्येक माणसे त्यांच्या त्यांच्या कामांच्या, संपर्काच्या जीवावर आजवर निवडून आलेली आहेत.

Maharashtra : “मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केल्याचा” आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

त्यांची शक्ती होती म्हणून तर तुम्ही त्यांना राष्ट्रवादी उभी करताना गोळा केले. परंतु काही नेत्यांना आता असे वाटू लागले आहे, की आपणच या लोकांना निवडून आणत आहोत. पवारांनी आता वयाचे भान ठेवत थोडे मोठे व्हायला हवे. मार्गदर्शकाच्या भूमिकेत जायला हवे. उगाचच याला पाड, त्याला पाड अशी वक्तव्ये पोरखेळ वाटतात. मग अशा वेळी आपल्या शक्तीची झाकली मूठही उघडी पडते आणि वयाचा मानही जातो. तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. साठ वर्षांत तुम्ही कितीतरी पक्ष बदलले, फोडले, भूमिका बदलल्या. मग याला काय म्हणायचे. तुम्ही केला तर स्वाभिमान आणि दुसऱ्याने केली तर गद्दारी हे बरोबर नाही.

शरद पवारांच्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांचा हक्क राज्यातील जनतेने कधीच नाकारला आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन सतत जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे. राज्यात आणि साताऱ्यातही महायुतीचे उमेदवार विजयी होतील. मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सर्वच उमेदवार त्यांचे मताधिक्य वाढवतील. पाडा पाडा म्हणणाऱ्यांचेच उमेदवार यंदा त्या त्या मतदारसंघातील मतदार पाडतील, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.

आमदार मकरंद पाटील यांनी मतदारसंघात मागील पाच वर्षांत साडेचार हजार कोटी रुपयांची कामे केल्याचे सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply