पुणे : राज्यातील शंभर शाळांना कायमस्वरुपी टाळे; ८०० शाळांचा बोगस पद्धतीने कारभार

Pune : राज्यात सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा मंडळाच्या जवळपास ८०० शाळा बोगस पद्धतीने कारभार करत आहेत. संबंधित शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यातील शंभर शाळांना कायमस्वरुपी टाळे ठोकले आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कागदपत्रांच्या बाबतीत गंभीर चुका करणाऱ्या शाळांवर फौजदारी कारवाई करावी लागणार असल्याचेही मांढरे यांनी स्पष्ट केले.

आरटीईची लॉटरी सोडत जाहीर झाल्यानंतर बोगस शाळांबाबत मांढरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यात अनधिकृतपणे चालणाऱ्या राज्य मंडळाच्या शाळांव्यतिरिक्त इतर १३०० शाळांची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. या शाळांची तपासणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. त्यापैकी साधारण ८०० शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटी गंभीर स्वरुपाच्या असल्याने शाळांची सखोल चौकशी करण्यात आली. शाळेकडे असणारे ना हरकत प्रमाणपत्र (मूळ एनओसी), संबंधित मंडळाचे मान्यता प्रमाणपत्र, राज्य सरकारकडून देण्यात येणारे इरादा पत्र या तीन कादगपत्रांची प्रमुख्याने पडताळणी करण्यात येत आहे. यापैकी एकही कागदपत्र नसल्यास, संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी लागणार आहे. मात्र, मान्यता रद्द केल्यानंतर, या शाळा न्यायालयाकडून दिलासा मिळवतात. त्यामुळे घाईने कारवाई न करता, शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांशी चर्चा करून ठोस कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यत शंभर शाळा बंद करण्यात आल्या असून, कारवाईची प्रक्रिया सुरुच राहणार आहे, असे मांढरे यांनी स्पष्ट केले.

खासगी शाळांची पालकांनी चौकशी करणे आवश्यक

पालक घर खरेदी करताना संपूर्ण चौकशी करतात, कागदपत्रे तपासतात. मात्र अशी चौकशी खासगी शाळांबाबत केली जात नाही. त्यामुळे पाल्याचा प्रवेश योग्य शाळेत होण्यासाठी पालकांनी शाळेच्या कागदपत्रांची चौकशी करावी. यू-डायस पोर्टलवर जाऊन, शाळेचा नोंदणी क्रमांक तपासण्याचे आवाहन मांढरे यांनी केले आहे. शाळांनीही मान्यतेची कागदपत्रे पालकांना दिसतील, अशा दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply