ऐतिहासिक वारशाला चालना! दापोली- खेडच्या सीमेवर एका किल्ल्याचा शोध, पहिली नोंद १७२८ मधील

खेड : पालगड (ता. दापोली) गावाजवळ म्हणजेच दापोली आणि खेड तालुक्यांच्या सीमेवर रामगड नावाच्या एका किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी लावला आहे. त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि वास्तू रचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

पालगडच्या पूर्वेस समुद्रसपाटीपासून अंदाजे ३९० मीटर (१२८० फूट) उंचीवर छोटेखानी किल्ला आहे. स्थानिकांना त्याची माहिती नाही. नव्याने शोधलेल्या रामगड किल्ल्यामुळे ऐतिहासिक वारशाला पुन्हा चालना मिळणार आहे. रामगड हा पालगडचा जोडकिल्ला असून, आजवर या किल्ल्याची स्थान निश्‍चिती झालेली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. यातील पहिला रामगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात, तर दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली, याविषयी आजतागायत कोणालाच माहिती नाही. मात्र, पालगडबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा, असा कयास आहे.

दोन्ही किल्ल्यांच्या बांधणीत अनेक समान दिसतात. किल्ल्याचा उल्लेख असलेली दोन-तीन कागदपत्रे उपलब्ध असून, त्यातील पहिली नोंद १७२८ मधील यादीत आहे. ही यादी ऐतिहासिक संग्रहांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. त्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांचा समावेश आहे. त्यात रामगडचा उल्लेख पालगडबरोबर झालेला असून, तो रामदुर्ग असा येतो. पुढील दोन्ही पत्रे पेशवे दप्तरातील असून, ती अनुक्रमे १७४५ आणि १८१८ मधील आहेत. यातील पहिले पत्र कोणी कोणास पाठवले याचा उल्लेख प्रस्तुत खंडातील प्रसिद्ध लेखात नाही. मात्र, रत्नागिरीमधील रामगड सिद्दीच्या ताब्यात असावा आणि तो सिद्दीवरील मोहिमेत परिसरातील रसाळगडबरोबर पेशव्यांच्या ताब्यात आला असावा, असे पत्रावरून समजते.

हे पत्र मार्च १८१८ मधील असून, इंग्रजी फौजा पालगड व रामगड येथे पहाटेपासून तोफांचा मारा करत असून, किल्ल्यावर लागलेली आग खूप दुरून दिसत असल्याचे त्यात म्हटले आहे. हे पत्र धोंडो विश्वनाथाने निळोपंत पुरंदर यांना पाठवले आहे. त्या पत्रावरून रामगड व पालगड हे दोन्ही किल्ले एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. पालगड आणि रामगड किल्ल्याभोवती एकूण पाच माच्या असून, रामगड माची किल्ल्याच्या पश्‍चिमेस असून सध्या ती राणी माची या नावाने ओळखली जाते. किल्ल्याच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रावरून पालगडच्या पश्‍चिमेकडे एक उंचवटा असून, त्यावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात.

काय आढळते किल्ल्यावर
* आकाराने छोट्या माथ्यावर बांधकाम
* किल्ल्याचा दरवाजा त्याचे २ संरक्षक बुरुज
* चहू बाजूस रुंद तटबंदी, तटबंदीतील ४ बुरुज
* किल्ल्याच्या आतील बाजूस एक सुटा बुरुज
* ६-७ इमारती काही थडगी, भांड्यांचे तुकडे
* तटबंदी व दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत.

ऐतिहासिक दस्तावेजांतील काही नोंदींच्या आधारे महिन्याभरापूर्वी रामगडाचे सर्वेक्षण केले. गावकऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांना काहीच माहिती नसल्याचे आढळले. त्यांनी वेगळाच गड दाखवला. अजून खोलात जाऊन संदर्भ तपासून आणि प्रत्यक्ष पाहणीतून शास्त्रीय पुरावे हाती लागले. त्याआधारे रामगड हा दुर्ग असल्याचे स्पष्ट झाले.
- डॉ. संदीप परांजपे, दुर्ग अभ्यासक



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply