Pune : अजित पवारांनी वेळेच्या आधीच उद्धाटन उरकलं, मेधा कुलकर्णी नाराज, म्हणाल्या विषय वाढवणार नव्हते, पण...


Pune : पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तशीरपणाच्याबाबतीत ओळखले जातात. याचदरम्यान, अजित दादांनी आज चक्क वेळेच्याआधीच एका इमारतीचं उद्धाटन करुन केलं. मात्र, त्यामुळे पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी चांगल्याच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अजितदादांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अजित पवार यांनीही ताणून न धरता पुन्हा उद्घाटन करण्याचा सल्ला दिला.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या 'मी विषय वाढवणार नव्हते, पण पत्रकार विचारायला आले, म्हणून सांगते, की १० मिनिटं लवकर उद्घाटन झालं, याचं नक्कीच मला वाईट वाटलं. माझी विनंती आहे अजित दादांना की रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या, पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉलनुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं तिथे सगळेच येणार होते. जी वेळ घोषित केली आहे त्याआधी उद्घाटन करू नये', अशी विनंती मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार यांना केली.

'बस किंवा फ्लाईट आपण पकडण्यासाठी जातो, ते आधीच निघून गेलं तर वाईट वाटणारच ना? मी वेळेच्या १० मिनिटं आधी आले होते, अजित दादा यांनी २० मिनिटांपूर्वीच उद्घाटन केलं', असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. 'पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेन. आमचे तिन्ही नेते जास्त काम करतात, ते आमचे आदर्श आहेत. फक्त अजित दादा यांनी वेळेच्या पूर्वी उद्घाटन करू नये एवढीच विनंती' असल्याचं कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.

नेमकं काय घडलं?

पुण्यात पहाटेपासून अजित पवार यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला होता. परशूराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवार यांनी पहाटे उद्धाटन केलं. पहाटे साडेसहा वाजता या इमारतीच्या उद्धाटनाची वेळ नियोजित होती. त्यासाठी मेधा कुलकर्णीही वेळेत उपस्थितही राहिल्या, मात्र अजित पवारांनी १० मिनिटं आधीच उद्घाटन उरकून घेतलं. वेळेआधी कार्यक्रम झाल्याने मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा सोबत उद्घाटन करण्याचं सुचवून तणाव निवळून टाकला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply