Parvati : पुणे परिसर दर्शन : पुणेकरांची लाडकी पर्वती

पुण्यातल्या महत्त्वाच्या जागा विचारल्या तर पहिल्या पाचात प्रत्येक पुणेकर पर्वतीच नाव घेईल. सकाळी सकाळी व्यायामासाठी, सायंकाळी हवा खाण्यासाठी लोक पर्वतीवर जातात. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही विलोभनीय दिसतात. अशी ही पर्वती पेशव्यांच्यासुद्धा आवडीची होती. इ. स. १७४९ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीवर मंदिरे बांधली. त्यातील मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वराचे पंचायतन. वैशाख शुद्ध पंचमी शके १६७१ म्हणजेच २३ एप्रिल १७५९ रोजी मंदिरात देवेश्वराची स्थापना झाली. टेकडीवर पर्वताई देवीचे पुरातन स्थान आहे. हा उल्लेख शिवकाळातही सापडतो. सध्या ही देवी देवदेवेश्वर मंदिरातील उजवीकडच्या मागच्या मंदिरात भवानी देवीसह प्रस्थापित आहे.

उजवीकडे पुढे विष्णू, डाव्या बाजूस पुढे सात अश्वांच्या रथात सूर्य आणि मागे गणपती अशी चार मंदिरे आणि मुख्य देवदेवेश्वराचे मंदिर असे हे पंचायतन आहे. मंदिराच्या पाच कळसांना तांब्यावर सोन्याचा मुलामा दिलेला होता.

त्यासाठी १०७९ तोळे सोने खर्ची पडले होते. पण पुढच्या धामधुमीच्या काळात यातले काहीच शिल्लक राहिले नाही. १७६३ च्या निजामाच्या हल्ल्यात पर्वतीचेही बरेच नुकसान झाले. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी देवळातल्या मूर्ती सिंहगडावर हलवण्यात येत. मंदिराच्या पलीकडे नानासाहेबांनी इ. स.१७५५ रोजी आपल्या निवासासाठी वाडा बांधला. तिथल्या सहाणेच्या खोलीत नानासाहेबांचे निधन झाले. तिथे आता त्यांचे स्मारक आहे. त्यांच्यासह इतर पेशव्यांची चित्रे तिथे लावलेली आहेत.

काय पहाल

  • पर्वतीवर जाताना खालून मंदिरापर्यंत एकूण ८८ पायऱ्या आहेत.

  • देवदेवेश्वराचे मंदिर, नानासाहेबांचे स्मारक, कार्तिकेय मंदिर, विष्णूचे मंदिर आणि पेशवे संग्रहालय

  • संग्रहालय सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत खुले असते.

  • पेशव्यांची शस्त्रे, वापरातील वस्तू इत्यादी अनेक गोष्टी उपलब्ध

  • प्रवेश शुल्क २० रुपये



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply