Mumbai  : महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात ३७० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण!

Mumbai  : दोन वर्षाच्या राजूला जेव्हा रक्ताचा कर्करोग असल्याचे आई-वडिलांना कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. उत्पन्न फारसे नाही आणि खर्चिक उपचाराला कसे पुरे पडणार, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. राजूला बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यास डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रुग्णालयात यासाठी येणारा २५ ते ४० लाखांपर्यंतचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. अशातच बोरिवली येथील महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात जाण्याचा सल्ला कोणीतरी दिला. येथे डॉ.ममता मंगलानी व त्यांच्या समवतेच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी राजूवर यशस्वी बोनमॅरो प्रत्यारोपण तर केलेच शिवाय स्वयंसेवी संस्थांच्या मदत मिळवून देऊन उपचाराच्या खर्चाचा मोठा भारही उचलला. राजूसारख्या शेकडो बालकांसाठी पालिकेचे हे केंद्र व तेथील डॉक्टर जीवनदायी बनले आहेत.

बोरिवली (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात आजपर्यंत तब्बल ३७० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण (बीएमटी) करण्यात आले आहे. अतिशय क्लिष्ट असलेले बोनमॅरो प्रत्यारोपण करून या केंद्राने मागील सहा वर्षात अशा अनेक बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत केली आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलेसेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. थॅलेसिमियाग्रस्त रूग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. मात्र, या रूग्णांना अनुरूप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्याने या बालकांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार करू लागते, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ.ममता मंगलानी यांनी दिली आहे. त्याचबरोबर रक्ताचा कर्करोग म्हणजे ल्युकेमीया आणि अनेक इतर कर्करोगांसाठी देखील या केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण व इतर संबंधित उपचार केले जातात. यानुसार गेल्या सहा वर्षात हजारो बालकांवर विविध प्रकारचे उपचार करण्यात आल्याचे डॉ. मंगलानी यांनी सांगितले.

Mumbai : गोखले पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार

 

महानगरपालिकेचे थॅलेसेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र अर्थात सीटीसी, पीएचओ व बीएमटी उपचार केंद्र हे अविरतपणे कार्यरत असून रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. याचाच एक भाग म्हणून थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगानेग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ साली महानगरपालिकेने बोरिवली (पूर्व) परिसरात हे उपचार केंद्र सुरू केले. या केंद्रात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आतापर्यंत ३७० रुग्णांचे बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले आहे. साधारणपणे या केंद्रात दरवर्षी सुमारे ६० ते ८० प्रत्यारोपण केले जातात. यामध्ये ‘ॲलोजेनिक’ आणि ‘ऑटोलॉगस’ प्रत्यारोपण या दोन्हीं प्रक्रियांचा समावेश आहे. या केंद्रात डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे १६८ एवढे मनुष्यबळ कार्यरत असून गेली अनेक वर्षे कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांची आहे.

मागील पाच वर्षात महानगरपालिकेच्या या केंदात केलेल्या ३७० ‘बीएमटी’मध्ये ११८ दाते हे पूर्ण अनुरूप म्हणजे रूग्णाचे भावंडे किंवा पालक आहेत. या व्यतिरिक्त ७० प्रकरणांमध्ये संबंधित दाते हे अर्धे अनुरूप म्हणजे पालक किंवा भावंडे आहेत. तसेच १२ प्रत्यारोपणामध्ये, स्टेम सेल दात्याच्या नोंदणीद्वारे जुळलेल्या असंबंधित दात्यांकडून स्टेम सेल प्राप्त करण्यात आले. तर ११० रुग्णांमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण ॲटोलॉगस म्हणजे रुग्णाच्या स्वत:च्या स्टेमसेल वापरुन करण्यात आलेले आहेत. बोनमॅरो अनुरुप असल्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रूग्णालयात २५ ते ४० लाख रूपयांची आवश्यकता असते. परंतु, महानगरपालिकेच्या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात ही सुविधा निःशुल्क आहे.

बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी प्रत्येक रूग्णाला स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण खोलीची आवश्यकता असते. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या या खोलीत रूग्णास कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची आत्यंतिक काळजी घेतलेली असते. बोरिवलीतील या केंद्रात देखील या प्रकारच्या स्वतंत्र व समर्पित आठ खोल्या असून अशा खोल्या एकाच ठिकाणी असलेला हा महाराष्ट्रातील या प्रकारचा मोठा ‘बोनमॅरो प्रत्यारोपण विभाग’ आहे. या व्यतिरिक्त उपचार केंद्रामध्ये थॅलेसेमिया, बालरोग रक्तदोष, कर्करोगग्रस्त २२ रुग्णांना दाखल करण्याची सोय उपलब्ध आहे. तर सहा खाटा या किमोथेरपी उपचारांसाठी राखीव असून १६ खाटा या वारंवार देण्यात येणाऱ्या रक्त संक्रमणासाठी वापरल्या जातात.

बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी सर्वसाधारणपणे ३० दिवस ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत बालकासोबत आई, वडील किंवा सर्वात जवळचा नातेवाईक रुग्णालयामध्ये राहू शकतो. या रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीला देखील राहण्यासह भोजनाची सुविधा दिली जाते. बालरूग्णाची मनोरंजनाची गरज व त्यांचे भावविश्व लक्षात घेऊन प्रत्येक खोलीत स्वतंत्र दूरचित्रवाणी संचाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. एवढेच नाही तर कार्टून चॅनल देखील या केंद्रातील प्रत्येक खोलीत उपलब्ध करून दिले आहेत. बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी दाखल झालेल्या बालकाला त्याची घरची खेळणी आणण्याची परवानगी असते. ही खेळणी निर्जंतुकीकरण करून बालकांना दिली जातात. उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या कालावधीत बालरुग्णाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि बालकांना मनोरंजनातून शिक्षण मिळावे, यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ मंगलानी यांनी सांगितले. बोनमॅरो प्रत्यारोपण झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात आठवड्यातून एकदा तपासणीसाठी रुग्णाला यावे लागते. त्यानंतर महिन्यातून एकदा व पुढे तीन ते सहा महिन्यातून एकदा याप्रमाणे वर्ष ते दीड वर्षे रुग्णांची व्यवस्थित तपासणी व काळजी घेण्यात येते असे बीएमटी फिजिशियन डॉ राजेश पाटील यांनी सांगितले. डॉ. मंगलानी यांच्यासह येथे सहसंचालक डॉ संतोष खुडे, क्लिनिकल हेड डॉ रत्ना शर्मा, डॉ राजेश पाटील, डॉ प्रणती किणी, डॉ. अमित जैन, डॉ. अर्पिता गुप्ता, डॉ भावना गौतम आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात.

बोरिवलीच्या या केंद्रात २०२२ मध्ये एकूण ९१४ रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले तर बाह्यरुग्ण विभागात १,२९४ रुग्ण उपचारासाठी आले होते. त्याचप्रमाणे एकूण ९,६२२ रुग्ण फॉलोअपसाठी आल्याचे सूत्रांनी सांगितले. २०२३ मध्ये एकूण १,०५५ रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले असून तपासणीसाठी १,३६३ नवीन रुग्ण आले. फॉलोअपसाठी १०,२६३ रुग्ण आले असून तब्बल ३७० रुग्णांवर बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची आणि पालकांची गरज लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन व सल्लामसलत करण्यासाठी समुपदेशक देखील या केंद्रात कार्यरत आहेत.रूग्ण आणि त्याच्यासोबत राहिलेल्या नातेवाईकांना आहारतज्ज्ञांच्या सूचनेनुसार तसेच निर्जंतुकीकरण केलेला आहार देण्यात येतो. रूग्ण दाखल झाल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपणाआधी एक महिना आणि उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक ते दोन वर्षांपर्यंत किंवा गरजेनुसार फॉलोअप घेतला जातो.

पेरिफेरल रक्त स्टेम सेल वेगळे करण्यासाठी याठिकाणी ‘ऍफेरेसिस’ या अत्याधुनिक संयंत्राची सुविधा उपलब्ध आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणाच्या रुग्णांना रक्तसंक्रमण करण्यापूर्वीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी रक्त घटकांवर गॅमा इरॅडिएशन करण्यासाठी ‘ब्लड इरॅडिएटर’ मशीनची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे या केंद्रात तीन पदव्युत्तर सुपर स्पेशलाइजेशन फेलोशिप कोर्सेसची सुविधा देखील उपलब्ध आहे. यामधे प्रत्येक फेलोशिप अभ्यासक्रमासाठी चार अशा तीन अभ्यासक्रमांसाठी एकूण १२ विद्यार्थी असतात. हे अभ्यासक्रम ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ आणि ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’ यांच्याशी संलग्न आहे. या विविध अभ्यासक्रमांच्या निमित्ताने सुपर स्पेशलायझेशनसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे तज्ञ डॉक्टर असतात. विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेल्या या डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे बाल रूग्णांना अधिक चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यास देखील मदत होते.

बोनमॅरो प्रत्यारोपण म्हणजे काय

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल पेशी दूषित असल्यामुळे त्यांच्या शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नियमितपणे अनुरुप रक्तदात्याचे रक्त घेऊन लाल पेशी द्याव्या लागतात. तथापि, अशा रुग्णांच्या शरीरात अनुरुप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणातील पेशींसह रक्त तयार करु लागते. ज्यामुळे बोनमॅरोच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर या रुग्णांना रक्त देण्याची आवश्यकता भासत नाही व रुग्ण थॅलेसेमियामुक्त होतो. थॅलासेमियामध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण हे सामान्यपणे आठ वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये केले गेल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात. तसेच रुग्णाच्या भावाचा किंवा बहिणीचा बोनमॅरो अनुरुप ठरण्याची शक्यता अधिक असते. या प्रत्यारोपणामुळे रुग्ण थॅलेसेमियामुक्त होण्याची शक्यता साधारणपणे ८० ते ९० टक्के असते. तसेच इतर रक्तदोष आणि कर्करोगग्रस्त मुलांमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण करुन त्यांना रोगापासून मुक्त करु शकतो.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply