Dhule Crime : बसच्या पुढे कार आडवी लावली, वाहनाला कट का मारला? जाब विचारत चालकाला बसमध्ये घुसून मारहाण

Dhule : राज्यात गुन्हेगारीचा दर वाढता वाढत आहे. गुन्हेगारांना जणू पोलिसांचा धाकच उरलेला नाही का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत . अशीच एक संतापजनक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. नेमकं झालं असं की, दोंडाईचा-जळगाव बस चालकास रस्त्यात बस अडवून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे काही वाहन चालकांनी चारचाकी वाहन एसटी बसला आडवे लावत बस थांबवली. त्यानंतर बसमध्ये चढून थेट बस चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

बसमध्ये उपस्थित प्रवाशांनी या मारहाणीला विरोध देखील केला. परंतु वाहनाला कट का मारला? या कारणावरून ही मारहाण झाली असून, यामध्ये मारहाण झाल्यानंतर बस चालकाने प्रवाशांच्या आग्रहानंतर पोलीस ठाण्यात बस नेत त्यासंदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पुढील तपास नरडाणा पोलीस करीत आहेत. अशाप्रकारे बस चालकाला रस्त्यात बस थांबवून मारहाण केल्यामुळे प्रवाशांमध्ये देखील संताप झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, शिर्डीमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी शहराला छावणीचं स्वरुप आलं असताना चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. या चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, चोरट्यांनी घटनास्थळावरुन पलायन करतानाची दृश्ये स्पष्ट दिसत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply