Chandrapur Flood: चंद्रपुरात अतिवृष्टीनंतर सखल भागातील नागरिकांना फटका; 700 हून अधिक नागरिकांना बोटीद्वारे काढण्यात आलं बाहेर

Chandrapur : चंद्रपूर शहरात अतिवृष्टीनंतर इरई नदीच्या बॅकवॉटरचा शहरातील सखल भागातील नागरिकांना फटका बसला आहे. सुमारे 700 हून अधिक नागरिकांना बोटीद्वारे काढण्यात बाहेर काढण्यात आले. सखल भागातील राजनगर- सहारा पार्क -सिस्टर कॉलनी- रहमतनगर या भागात पुराचा अधिक फटका बसला आहे. बॅक वॉटरमुळे धोका वाढला, तर इरई धरणाची दारे उघडल्याने स्थिती अधिक बिकट झाली. 

चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. याशिवाय चंद्रपूर शहरालगत धरणाची दारे उघडल्याने शहरातील सखल भागात इरई नदीचे पाणी शिरण्यास प्रारंभ झाला.

सकाळपासून या नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, मनपाचे पथक, पोलीस पथकांनी यासाठी प्रयत्न केले चंद्रपूर शहरातील सखल भागात नव्या वसाहतींमध्ये पाणी शिरण्यास प्रारंभ झाला तसतसा बचाव कार्याचा वेग देखील वाढला.

आज पहाटेपासून चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. एकीकडे अतिवृष्टी दुसरीकडे धरणाची दारे उघडण्याची वेळ तर तिसरीकडे वर्धा व वैनगंगा नद्या दुथडी धरून वाहत असल्याने इरई नदीचे पाणी त्यात समाविष्ट झाले नाही.

परिणामी हे पाणी उलट दिशेने चंद्रपूर शहराच्या विविध भागात पोहोचले. अचानक पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे नागरिकांना बाहेर निघण्याची उसंत मिळाली नाही. बचाव पथकाने या सर्वच भागांमध्ये बोटीद्वारे बचाव मोहीम चालविली आहे.

Malkapur Bus Accident: बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा वाढला; ६ प्रवाशांची ओळख पटली

बचाव पथकाने आणलेल्या सर्वच पूरग्रस्त नागरिकांना निवास व भोजनाची व्यवस्था मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. इरई धरणाची आता चार दारे उघडण्यात आली असून, इरई नदीकाठच्या सर्वच गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज संध्याकाळपुरती या भागातील बचाव मोहीम थांबविण्यात आली असून, उद्या सकाळी पाणी पातळी वाढल्यास पुन्हा एकदा वेगवान बचाव कार्याला सुरुवात होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply