Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकले; सौराष्ट्र, कच्छमध्ये मुसळधार पाऊस; वीज खंडित

Biparjoy Cyclone : अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले. यावेळी वादळातील वाऱ्यांचा वेग १४५ किमी प्रतितास इतका होता, तर वादळ १५ किमी वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येथे सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. वादळ धडकण्याची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ मागील दहा दिवसांपासून वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत होते. चक्रीवादळ दुपारी धडकण्याचा पूर्वीचा अंदाज होता. प्रत्यक्षात ते संध्याकाळी ते धडकण्यास सुरुवात झाली.

यावेळी वादळ जखाऊ बंदरापासून ७० किलोमीटर दूर समुद्रात होते. समुद्रातून वादळ पूर्णपणे जमिनीवर सरकण्यास किमान चार तास लागतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

हे श्रेणी-३ मधील वादळ आहे. चक्रीवादळाच्या डोळ्याची, म्हणजेच केंद्रबिंदूची रुंदी ५० किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकताना वाऱ्याचा वेग वाढत जाईल, असे डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले. कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

याशिवाय, पिके, घरे, रस्ते, वीजेचे खांब यांचेही नुकसान होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळाची पूर्वकल्पना असल्याने गुजरात सरकारने सुमारे एक लाखांहून अधिक जणांना सुरक्षितस्थळी आधीच हलविले होते.

यामुळे कोणतीही जीवित हानी न होण्याची आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे. वादळाच्या प्रभावामुळे आज सकाळपासूनच मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर उंच लाटा उसळत होत्या.

सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईतही समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली होती. वादळामुळे किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला असून वादळी वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडली.

तापमानबदलाचा परिणाम

बिपोरजॉय हे भारताला धडकणारे या वर्षातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे चक्रीवादळ आहे. हे वादळ पाकिस्तानातही घुसणार आहे. मागील काही दशकांत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १.२ अंश सेल्सिअसवरून १.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने अरबी समुद्रात तयार होणारी वादळे अधिक शक्तिशाली ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सरकारकडून आढावा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला. वादळाची पूर्वकल्पना असल्याने केंद्र आणि गुजरात सरकारने किनारपट्टीवर राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांची मिळून ३० पथके तैनात केली आहेत.

याशिवाय, राज्याच्या रस्ते आणि बांधकाम विभागाची ११५ पथके, वीज मंडळाची ३९७ पथके तैनात आहेत. याशिवाय, तिन्ही संरक्षण दलांची पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिक आणि हजारो जनावरांना सुरक्षितस्थळी हलविल्याने जीवित हानी होणार नाही, अशी सरकारला आशा आहे.

दीर्घकाळ टिकलेले वादळ

‘बिपोरजॉय’ हे अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ठरले असल्याचे भारतीय हवामान विभागाकडील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. सहा जून रोजी पहाटे साडे पाच वाजता तयार झालेले हे वादळ दहा दिवस आणि बारा तासांपासून (गुरुवारी संध्याकाळपर्यंत) समुद्रांत घोंघावत आहे. आधीच्या नोंदीनुसार, २०१९ मध्ये तयार झालेले क्यार हे चक्रीवादळ नऊ दिवस १५ तास टिकले होते.

बिपोरजॉय’चा परिणाम

  • किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट

  • किनारपट्टीपासून १० किमीच्या अंतरावरील वीस गावांमधील लोक सुरक्षितस्थळी

  • वादळी वाऱ्यांमुळे २४० गावांमधील वीजपुरवठा खंडित

  • सखल भागांमध्ये पुराचा धोका, अनेक वृक्ष उन्मळून पडले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply