Manipur Violence: मणिपूरमध्ये अडकलेले सर्व विद्यार्थी सुखरुप! मुख्यमंत्री शिंदेनी स्वत: केली विचारपूस

CM Eknath Shinde Contact students in Manipur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंगळुरू येथून मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यातील 14 मराठी विद्यार्थ्यांना मणिपूर येथील शिवसेना भवनात सुखरूप आणण्यात आले असून त्यांना खायला अन्न आणि बाकीच्या वस्तू देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 8 विद्यार्थ्यांना लवकरच याठिकाणी आणण्यात येणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

तसेच शिवसेनेचे मणिपूर राज्य प्रमुख टोम्बी सिंह यांनी चांगली सोय केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना ते सुखरूप आहेत का? अशी विचारणा केली, तेव्हा विद्यार्थ्यांनी आम्ही सर्व सुखरूप आहोत असे सांगून एवढ्या तत्परतेने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मणिपूरमध्ये NEET-UG परीक्षा पुढे ढकलली

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता मणिपूरमध्ये 7 मे रोजी होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शनिवारी सांगितले की ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे मणिपूरमध्ये आहेत त्यांची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारामुळेआतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की अधिकृत मृतांची संख्या 54 आहे, त्यापैकी 16 मृतदेह चर्चंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर 15 मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत ठेवण्यात आले आहेत.

रिजिजू यांनी केले शांततेचे आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ईशान्येकडील राज्यांना शांतता कायम ठेवण्याचे आणि जाती समुहांमध्ये सुसंवाद राखण्याचे आवाहन केले आहे. मैती आणि कुकी एकाच राज्यातील रहिवासी आहेत आणि दोघांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असे दिल्लीतील एका कार्यक्रमाच्या प्रसंगी रिजिजू म्हणाले. शांतता नांदेल तेव्हाच समाजाचा विकास होईल. मणिपूरमधील हिंसाचार कमी करण्यासाठी केंद्र सर्व शक्य पावले उचलत आहे असे देखील ते म्हणाले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply