महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी; CM शिंदेंनी दिली माहिती

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या दोन सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. याबाबतची माहिती खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. याशिवाय येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याचं दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी तालुक्यात २००७ ते २०१०मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत हे उघड झालं होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना याबाबतचे संकेत सुद्धा दिले होते. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करुन या व्यवसायातील अडचणी दूर करुन राज्याच्या महसूलात वाढ झाली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आता राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याच्या दोन खाणी आढळल्या असल्याची माहिती आहे. केंद्रीय अधिकाऱ्यांनी तसा अहवाल दिला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिंदे यांनी हा खुलासा केला आहे.

सोन्याच्या खाणीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करु शकतो', असा विश्वासही शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply