पुण्यातील सहा प्रभागांत पाणी निचरा यंत्रणेचा अभाव : १६०० किलोमीटर लांबीचे रस्ते ; पावसाळी वाहिन्या सुमारे ४०० किलोमीटर

पुणे : स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरविणाऱ्या महापालिकेला सहा प्रभागांत पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच कार्यान्वित करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती आहे. शहराचा भौगोलिक विचार करता शहरासाठी ८०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची गरज असून सध्या ४०० किलोमीटर लांबींच्या पावसाळी वाहिन्या शहरात असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे सहा प्रभागांत पाणी वाहून जाणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे शहराला अतिमुसळधार पावसात फटका बसत असल्याचे अधोरेखित झाले आहे

शहराला रविवारी पावसाने झोपडून काढले. त्यानंतर महापालिकेच्या पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्यांची यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शहरात सातत्याने पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळी वाहिन्यांचे जाळे पूर्ण कार्यान्वित नसल्याची कबुलीही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.शहरात १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांचे जाळे लक्षात घेता शहरासाठी ८०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीमध्ये केवळ निम्म्याच ठिकाणी पावसाळी वाहिन्या आहेत. जवळपास चारशे किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या पाण्याचा निचरा करण्यास अकार्यक्षम ठरत आहेत. पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थान विभागाच्या आराखड्यानुसार विमाननगर, वडगांवशेरी, खराडी, धायरी, हिंगणे खुर्द, वारजे या सहा ठिकाणी ही यंत्रणाच अस्तित्वात नाही.

सध्या बारा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर ८० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या आहेत. तर उर्वरित रस्त्यांवर ३२५ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांचे जाळे आहे. अपुरी व्यवस्था असल्याने पावसाळी वाहिन्यांची यंत्रणा विकसित करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. सन २०१५ मध्ये तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेअंतर्गत महापालिकेने दोन हजार कोटींची योजना हाती घेतली होती. त्यापैकी केंद्राकडून दोनशे कोटींचा निधी पावसाळी वाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी महापालिकेला मिळाला, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र पावसाळी वाहिन्यांचे जाळे कार्यान्वित करण्यासाठी हा निधी अपुरा ठरला तसेच दीर्घाकालीन पाणी साचण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी पावसाळी वाहिन्यांची यंत्रणा या निधीतून विकसित झाली. त्यावरून पाणी साचण्याची ठिकाणे ४०० वरून १०० वर आली. मात्र आता पुन्हा नव्याने काही ठिकाणांवर पाणी साचले जात आहे, त्यामुळे महापालिकेपुढील आव्हानही वाढले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply