पुण्याच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष; महापालिका अधिकाऱ्यांबरोबर घेणार बैठक

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून यासंदर्भात येत्या काही दिवसांत महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, पाणीपुरवठ्याससह काही प्रश्न मार्गी लागतील, असा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रलंबित प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली . शहराबरोबरच महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील समस्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी नाना भानगिरे यांनी केली. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, सय्यदनगर हांडेवाडी येथे भुयारी मार्ग करावा, शहराच्या वाढीव पाणीकोट्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, शहरासाठी मुळशी धरणातून पाच अब्ज घनफूट पाणी उपलब्ध व्हावे, सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात बाबत उपायोयजना, निवासी मिळकतींना चाळीस टक्के कर सवलत पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील प्रलंबित निर्णयाबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबतची मागणी भानगिरे यांनी केली. यासंदर्भात येत्या काही दिवसांत महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती भानगिरे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply