पुणे – सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू झाला. ट्रकने शेतीमाल वाहतूक करणारा टेम्पो आणि मोटारीला धडक दिली. अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली.

ओंकार दत्तात्रय पाळेकर (वय २३, दहीवळी गाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि सुनिल भीमराव पवार (वय ४०, रा. फूलचिंचोळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मंगेश बकंट खोचरे (वय २२) व सर्फराज खलीद जहागिरदार (वय २४, दोघे रा. दहिवळी गाव, ता. माढा, जि. सोलापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रोहित गोसावी (वय २६, रा. दहिवळी गाव, ता. माढा, जि. सोलापूर) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ट्रकचालक अनिकेत राजेंद्र लोंढे (वय २६, रा. चिंचोली, ता. माढा, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित, ओंकार, सर्फराज हे शेतकरी आहेत, ते टेम्पोतून कलिंगडं घेऊन पुण्यातील मार्केट यार्डला रात्री अकराच्या सुमारास जात होते. तर, मोटारचालक सुनील पवार पुण्याकडे जात होते. रात्री अकराच्या सुमारास लोणीकाळभोरमधील कदमवाक वस्तीजवळ हॉटेल ग्रँडसमोर वाहतूक विस्कळीत झाली होती. त्या वेळी मोटारचालक पवार यांनी अचानक ब्रेक दाबला. पाठीमागून येणाऱ्या टेम्पोचा मोटारीला धक्का लागला. त्या वेळी मोटारचालक पवार मोटारीतून खाली उतरले आणि त्यांनी मोटारीची पाहणी केली. त्यानंतर टेम्पोचालक ओंकार खाली उतरला. त्या वेळी पुण्याकडे निघालेल्या भरघाव ट्रकने रस्त्यावर थांबलेले मोटारचालक सुनिल आणि टेम्पोचालक ओंकार यांना धडक दिली. तेथे थांबलेले मंगेश आणि सर्फराज जखमी झाले. अपघातानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली. कलिंगड वाहतूक करणारा टेम्पो आणि मोटारीचे नुकसान झाले.

गंभीर जखमी झालेल्या चौघांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच ओंकारचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान मोटारचालक सुनिल यांचा ससून रूग्णालयात मृत्यू झाला. ट्रकचालक लोंढेला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply