पुणे : राज्यभर अल्पावधीचा गारवा; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

पुणे : कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीबरोबर उत्तरेकडील राज्यांत तापमानात घट झाल्याने राज्यातील गारव्यात वाढ झाली आहे. सर्वच भागांत रात्रीसह दिवसाचे तापमानही सरासरीखाली गेले आहे. किमान तापमानात काही भागांत मोठी घट झाल्याने रात्री थंडीचा कडाका जाणवतो आहे. मात्र, हवामानात पुन्हा बदल होणार असल्याने हा गारवा अल्पावधीचा ठरणार आहे. पुढील दोन दिवसांनंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या सर्वच भागात आकाश निरभ्र असून, हवामान कोरडे झाले आहे. हिमालयीन विभागात आणि जम्मू-काश्मीरमध्ये काही भागांत बर्फवृष्टी होत आहे. या भागातून वारे वाहत असल्याने उत्तरेकडील बहुतांश राज्यातील तापमानात घट झाली आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून राज्यातही बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला आहे. मध्य महाराष्ट्रात काही भागांत ११ अंशांच्या जवळपास किमान तापमानाचा पारा आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानातही घट होऊन ते सरासरीच्या खाली आल्याने काही भागांत दिवसाही गारवा जाणवतो आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील तमिळनाडू आणि जवळच्या राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे. समुद्रातून जमिनीच्या दिशेने बाष्पाचा पुरवठा होणार आहे. त्यातून २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिणेकडे पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोणत्याही भागात पावसाची शक्यता नसली, तरी तापमानावर त्याचा परिणाम होणार आहे. दोन दिवसांनंतर किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन गारवा कमी होईल. पुढील काळातही तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे.

शनिवारी (१८ नोव्हेंबर) नाशिक येथे १०.४ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ औरंगाबाद ११.१, पुणे ११.३, नागपूर ११.६, गोंदिया १२.०, महाबळेश्वर १२.५, जळगाव १३.०, सातारा १३.२, परभणी १३.२, अकोला १३.३, नगर १३.८, नांदेड १४.४, सांगली १५.२, सोलापूर १७.३, रत्नागिरी २०.०, मुंबई २३.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ३.५ अंशांनी, तर विदर्भात काही भागांत ४ अंशांनी घटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply