पुणे : मतदारयादीत नोंदविण्यासाठी शेवटचे १२ दिवस शिल्लक ; प्रारूप मतदारयादी ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांना नाव नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार मतदारयादी नाव नोंदविण्यासाठी पुणेकरांना शेवटचे १२ दिवस संधी असणार आहे.

पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेंतर्गत २४ ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदारांचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग किंवा भाग यांची गरजेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांच्या पूनर्रचना करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुरवणी आणि एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येणार आहे.

जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

मतदार म्हणून नोंदणी कशी कराल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादी नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

शहरातील आठ मतदारसंघांमधील मतदार संख्या

वडगाव शेरी ४,७१,०१०, शिवाजीनगर २,९०,९१९, कोथरुड ४,३४,५७५, खडकवासला ५,४०,५७२, पर्वती ३,५६,२१२, हडपसर ५,५५,९१०, पुणे कॅन्टोन्मेंट २,८७,५३५, कसबा पेठ २,८६,०५७ असे शहरात एकूण मतदार ३२ लाख २२ हजार ७९० एवढे आहेत. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ८१ लाख ५८ हजार ५३९ असून पुरुष मतदार ४२ लाख ७२ हजार ५३४ आहेत, तर महिला मतदारांची संख्या ३८ लाख ८५ हजार ६७६ एवढी आहे, असेही निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply