पुणे पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ९५ टक्के आरक्षित

पुणे : करोना आटोक्यात आल्याने पर्यटनस्थळे निर्बंधमुक्त झाली असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) निवासस्थाने पूर्ण क्षमतेने खुली करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालयांना १ मेपासून उन्हाळी सुटय़ा लागणार आहेत. सुटय़ांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे नियोजन सुरू केले असून महामंडळाकडून उन्हाळी सुटीनिमित्त खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध शिबिरे, प्रोत्साहनपर पारंपरिक खेळ, योग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिवाळी, नाताळनंतर उन्हाळी सुटीतही पुणे महामंडळाची निवासस्थाने ९५ टक्के आरक्षित झाली आहेत.

करोना संसर्ग आटोक्यात आल्याने सर्व निर्बंध दूर करण्यात आले आहेत. परीक्षा संपल्याने सुटय़ांच्या कालावधीमध्ये भटकंती करण्यासाठी पर्यटकांचे नियोजन सुरू झाले आहे. विशेषत: यंदा उन्हाच्या तीव्र झळा पोहोचत असून सुटीमध्ये समुद्रकिनारा, थंड आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांचा ओढा ऑनलाइन आरक्षणातून दिसून आला आहे.

याबाबत बोलताना महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, ‘या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडित व्यावसायिकांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. योग आणि वेलनेसची शिबिरे घेण्यात येणार असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यांसारखे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. करोनानंतर दिवाळी, डिसेंबर आणि आता उन्हाळी सुटीतही महामंडळाच्या पुणे विभागातील निवासस्थानांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. करोनानंतर प्रथमच ही स्थिती दिसून येत असून सध्या १० जूनपर्यंत महामंडळाची ९५ टक्के निवासस्थाने आरक्षित झाली आहेत.’.

सुविधा जाहीर

ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचाऱ्यांसह आजी – माजी सैनिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांसाठी खास सवलत, समूहाने २० खोल्यांपेक्षा जास्त खोल्यांचे आरक्षण केल्यास, शालेय सहलींसाठी खास सवलती, विनामूल्य न्याहरी, प्री-वेडींग-रिसेप्शन फोटोशूट, बैठकांसाठी सभागृह, वर्क फ्रॉम नेचर, वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वन्यजीव, खेळ, आसपासच्या निसर्गाची, खाद्यपदार्थाची व्हॉट्सअ‍ॅप समूहासह सामाजिक माध्यमांतून माहिती देण्यात येत आहे.

या ठिकाणांना पर्यटकांची पसंती

कडक उन्हाळय़ामध्ये पर्यटक जल पर्यटनासाठी गर्दी करीत आहेत. पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. महामंडळाकडून पर्यटकांना निखळ पर्यटन, निसर्ग आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी  http://www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply