नीरज चोप्रा वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र, पहिल्याच प्रयत्नात केलं स्थान निश्चित

ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. पात्रता फेरीसाठी २४ वर्षीय नीरज चोप्रा ‘अ’ गटामध्ये होता. भाला फेकण्यासाठी सर्वात पहिला क्रमांक नीरज चोप्राचा होता. युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८३.५० मीटर अंतर पार करण्याची आवश्यकता असते. ‘अ’ गटात नीरज चोप्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या गटातून टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच यानेदेखील अंतिम फेरी गाठली.

नुकतंच नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये रौप्य पदक जिंकत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड केला. नीरज चोप्राने ८९.९४ मीटर अंतर पार केलं. ऑगस्ट २०१८मध्ये झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने चौथे स्थान मिळवलं होतं. त्यावेळी त्याने ८५.७३ मीटर अंतरावर भाला फेकला होता.

तसंच तुर्कू (फिनलंड) येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत २४ वर्षीय नीरजने राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावलं. मग क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत आव्हानात्मक वातावरणाचा सामना करीत नीरजने ८६.३० मीटर अंतर गाठत सुवर्णपदकाची कमाई केली. फिनलंडमधील या दोन्ही स्पर्धामधील कामगिरीमुळे नीरजच्या हंगामाला सकारात्मक सुरुवात झाली. तुर्कू येथील स्पर्धेत क्युर्टानेपेक्षा अधिक तारांकित खेळाडू सहभागी झाले होते. पावसामुळे मैदान निसरडे झाल्यामुळे क्युर्टानेच्या स्पर्धेतील तिसऱ्या प्रयत्नात नीरज घसरला; परंतु सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

अन्नू अंतिम फेरीत ;भारताच्या भालाफेकपटूला सलग दुसऱ्यांदा यश

भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अन्नूने पहिल्या प्रयत्नात सदोष फेक केली, तर दुसऱ्या प्रयत्नात ५५.३५ मीटर अंतर गाठलं. त्यामुळे तिचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात येण्याची चिन्हं होती. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात तिने ५९.६० मीटर अंतर गाठलं. जे यंदाच्या हंगामातील तिच्या ६३.८२ मीटर या सर्वोत्तम कामगिरीइतके नसले, तरी अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेसे होतं.

पारुल अपयशी

महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत पारुल चौधरीला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. १५:५४.०३ मिनिटे वेळ नोंदवणाऱ्या पारुलला दुसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत १७वा क्रमांक, तर एकंदर ३१वा क्रमांक मिळाला. पारुलने यंदाच्या हंगामात १५:३९.७७ मि. आणि कारकीर्दीतील १५:३६.०३ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply