नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या ९ सब व्हेरियंटनं टेन्शन वाढवलं, रिपोर्टमधून मोठा खुलासा

नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट आता जवळपास संपल्यात जमा आहे. मात्र अजूनही महामारीचा धोका टळलेला नाही. दोन ते तीन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनानं देशात पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये बरेचसे रुग्ण दिल्लीतील असल्याचे समोर आलं आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे तब्बल १००९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आतापर्यंत दिल्लीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. जीनोम सिक्वेसिंगच्या रिपोर्टनुसार, दिल्लीत कोरोना रुग्णवाढीचं प्रमुख कारण ओमिक्रॉन व्हेरियंटचे ९ सब व्हेरिएंट आहे. यामध्ये ओमिक्रॉनच्या BA.2.12.1 व्हेरियंटसह आणखी ९ व्हेरियंटचा समावेश आहे. 10 एप्रिलपर्यंत, दिल्लीत ६०८ सक्रिय कोरोनाचे रुग्ण होते. त्यापैकी फक्त १७ (२.८० टक्के) रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. मात्र, १६ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट होऊन १ हजार २६२ झाली.

रुग्णसंख्या हजाराच्या वर

गेल्या २४ तासांत दिल्लीत तब्बल १००९ कोरोना रुग्ण आढळून आले असून, यामध्ये एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे. मंगळवारी (१९ एप्रिल) हीच रुग्णसंख्या ६०१ वर होती; मात्र आता त्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर ५.७० इतका आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी वाढ होत असली तरी, आतापर्यंत रुग्णालयात एकूण सक्रिय रुग्णांपैकी तीन टक्क्यांहून कमी रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत आता पुन्हा एकदा मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply