गोवा : प्रमोद सावंतांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार का? बैठकीनंतर होणार घोषणा

पणजी : गोव्यात भाजपकडून विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं नाव पुढील मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं होतं. पण आता सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण यासाठी विश्वजीत राणे यांनी देखील दिल्ली दरबारी फिल्डिंग लावली आहे. यापार्श्वभूमीवर आज (सोमवार) संध्याकाळी चार वाजता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर गोव्याचा मुख्यमंत्री कोण असेल? यावर शिक्कामोर्तब होईल. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.  सध्या प्रमोद सावंत हे गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. गोव्यात भाजपनं विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला ४० पैकी २० जागा मिळाल्या. बहुमतापासून केवळ एकच जागा मागे असलेल्या भाजपनं अपक्षांच्या मदतीनं सत्तास्थापनेचा दावा केला आहे. पण माजी आरोग्य मंत्री आणि वरिष्ठ सभागृह नेते विश्वजीत राणे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चेचा तोंड फुटलं. या भेटीदरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रमोद सावंत यांनाच आणखी एक मुख्यमंत्रीपदाची टर्म मिळेल असं सूचवलं आहे. पण दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांच्या मते विश्वजीत राणे यांचा भाजपच्या विजयात महत्वाचा वाटा असल्याचं सांगत आहेत. त्यांची कामगिरी ही दखल घेण्यासारखी आहे. त्यामुळं विश्वजीत राणे यांचा गोव्यात भाजपचं सरकार स्थापण्यात मोठा वाटा असणार आहे. दरम्यान, गोव्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी रविवारी सांगितलं होतं की, पक्षाचे केंद्रीय निरिक्षक केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन हे सोमवारी गोव्याच्या दौऱ्यावर येणार असून संध्याकाळी ४ वाजता सर्व निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांची बैठक होईल. यामध्ये पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदाची निवड होईल. त्याचबरोबर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? हे देखील जाहीर होईल. या बैठकीला निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सीटी. रवी हे देखील उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रमही अद्याप निश्चित झालेला नाही. पण हा कार्यक्रम राजभवनातील दरबार हॉलमध्ये न होता तलेगाओ येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअममध्ये पार पडेल अशी अतिरिक्त माहिती त्यांनी दिली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply