कोल्हापूर : जोगवा मागणारा आवाज आता समाजाच्या प्रश्नांसाठी घुमणार; हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

कोल्हापूर : हुपरी नगरपरिषदेने तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक पद देऊन त्याचा सन्मान केला आहे. अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वीकृत सदस्यपदी तृतीयपंथींना स्वीकारणारी हुपरी ही पहिली नगरपरिषद ठरली आहे. आजपर्यंत देवआई म्हणून ओळख असणाऱ्या तात्यासो हांडे यांना आज नवी ओळख मिळाली आहे.

दारोदारी जोगवा मागून गुजराण करणाऱ्या तात्यासो हांडे यांचा आवाज आता जोगवा मागण्यासाठी नाही तर समाजाच्या प्रश्नांसाठी घुमणार आहे. कारण हुपरी नगरपरिषदेने त्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी देत वेगळा इतिहास रचला आहे.

नगरपालिकेत मिळालेल्या या संधीने आयुष्याचे सोने झाल्याची प्रतिक्रिया तात्यासो हांडे यानी दिली आहे. आजपर्यंत अनेकांनी हिणवले, झिडकारले पण आता सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर तृतीयपंथी समाजानेही आमचा प्रतिनिधी आता सभागृहात गेल्याने समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हुपरी नगरपरिषदेवर ताराराणी आघाडीची सत्ता आहे. देशात आदिवासी समाजातील महिलेला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केले. तर आम्ही तृतीयपंथी समाजातील व्यक्तीला नगरसेवक पद देऊन त्यांचा त्याच धर्तीवर सन्मान केल्याचे ताराराणी आघाडीचे नेते राहुल आवाडे यांनी सांगितले

बहुमत असेल तर या राज्याचा मुख्यमंत्री तृतीयपंथी सुद्धा होऊ शकतो. असं वक्तव्य विधानसभेचे विरोधीपक्षनते अजित पवार यांनी काय दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र आज हुपरी नगरपरिषदेनं तृतीयपंथीची निवड करून संपूर्ण राज्यातील राजकारणाला आदर्श घालून दिला आहे. हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply