राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : कामगिरी उंचावण्याचे भारतासमोर आव्हान ; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात

बर्मिगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत असून नेमबाजीच्या अनुपस्थितीत पदकतालिकेत अव्वल पाचमधील स्थान टिकवण्यासाठी भारताला उर्वरित क्रीडा प्रकारांतील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.

भारताचे २१५ खेळाडू १५ विविध क्रीडा प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा गुरुवारी सायंकाळी अ‍ॅलेक्झँडर स्टेडियम येथे पार पडेल. स्पर्धेसाठी होणारा खर्च पाहता ५६ देशांमधून कोणीही राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडे (सीजीएफ) आयोजनासाठी तयारी दर्शवली नाही. ‘सीजीएफ’चे ७२ सदस्य असले तरीही ५६ देशांनी मिळून हा महासंघ बनला आहे. त्यामुळे ब्रिटन गेल्या २० वर्षांत तिसऱ्यांदा या बहुद्देशीय स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धा आयोजनाबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर अखेर बर्मिगहॅमला याचे यजमानपद बहाल करण्यात आले.

२०१२च्या लंडन ऑलिम्पिकनंतर ब्रिटनमधील सर्वात मोठी आणि महागडी स्पर्धा ठरणार आहे. करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धेसाठी आतापर्यंत ७७ कोटी, ८० लाख पौंड्स इतका खर्च झाला आहे.

नेमबाजांच्या अनुपस्थितीत अन्य क्रीडा प्रकारांतून अपेक्षा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आजवर भारतीय खेळाडूंनी चुणूक दाखवली आहे. २००२ पासून भारतीय संघ या स्पर्धेत अव्वल पाच संघांत असायचा. यासाठी भारताची मदार ही नेमबाजीवर होती. मात्र या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी वगळल्याने वाद निर्माण झाला होता. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या ६६ पदकांपैकी २५ टक्के पदके ही नेमबाजांनी मिळवून दिली होती. यात सात सुवर्णपदकांचाही समावेश आहे. त्यामुळे नेमबाजांच्या अनुपस्थितीत भारतीय पथकाच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा असतील. या वेळी वेटलििफ्टग, बॅडिमटन, बॉिक्सग, कुस्ती आणि टेबल टेनिस यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा असणार आहेत. अ‍ॅथलेटिक्समध्ये गेल्या ७२ वर्षांत भारताला २८ पदकेच जिंकता आली आहेत. नीरज चोप्राने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताच्या पदकाच्या आशा धूसर झाल्या आहेत.

कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॅडिमटन, टेबल टेनिसकडे नजरा

कुस्तीमधील १२ खेळाडूंकडून भारताला सर्वाधिक अपेक्षा आहेत. गतविजेता विनेश फोगट आणि बजरंग पुनिया मागील स्पर्धेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील अशी अपेक्षा आहे. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पाच सुवर्णपदकांसह १२ पदकांची कमाई केली होती. मागील स्पर्धेत वेटलििफ्टगपटूंनी पाच सुवर्णपदकांसह नऊ पदके मिळवली होती. या वेळीही वेटलििफ्टग पथकाचे नेतृत्व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू करेल. दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखाली असलेल्या बॅडिमटन पथकाकडून महिला एकेरी, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र सांघिक गटांमध्ये पदक जिंकण्याची शक्यता आहे. या संघात जागतिक स्पर्धेतील पदक विजेता किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेनचा समावेश आहे. टेबल टेनिसमध्ये गेल्या स्पर्धेत भारताने आठ पदके कमावली होती. त्यामधील अर्धी पदके मनिका बत्राने मिळवली. या वेळी भारताला दोन सुवर्णपदके मिळतील अशी अपेक्षा आहे.

स्क्वॉश, बॉक्सिंग, हॉकी, क्रिकेटमधूनही भारताला आशा

भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाचा प्रयत्न या वेळी सर्वोत्तम कामगिरीचा असेल. मागील स्पर्धेत त्यांना एकही पदक जिंकता आले नव्हते. भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल, तर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणाऱ्या महिला संघाचे लक्ष्य अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळवण्याचे असेल. बॉिक्सगपटूंनी मागील स्पर्धेत तब्बल नऊ पदकांची नोंद केली होती. भारताची मदार ही अमित पंघाल आणि लवलिना बोरगोहेनवर असेल. जगज्जेत्या निकहत झरीनकडून अपेक्षा असतील. स्क्वॉशपटूंना एकेरी गटात पदकाची संधी आहे, तर मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीतमध्ये भारताला सुवर्णपदकाच्या आशा आहेत. क्रिकेटचा पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय महिला  संघाकडे सर्वाचे लक्ष असेल.

उद्घाटन सोहळा

’ वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स,

सोनी टेन २, ३, ४

सिंधू भारताची ध्वजवाहक

दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ात भारतीय पथकाची ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बुधवारी तिच्या नावाची घोषणा केली. उद्घाटन सोहळय़ामध्ये १६४ खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेत एकूण २१५ खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने भारताच्या ध्वजवाहकाची जबाबदारी पार पाडली होती.

संधी हुकल्याने नीरज निराश

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी होणार आहे. यामध्ये भारताच्या ध्वजवाहकाची धुरा नीरजच्या खांद्यावर होती. मात्र दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने तो निराश झाला आहे. ‘‘मला जेतेपद कायम राखता येणार नसून भारताचे प्रतिनिधित्व करण्यास मिळणार नाही. यासह भारताचा ध्वजवाहक म्हणून उद्घाटन सोहळय़ात सहभागी होण्याची संधी गमावल्याने मी निराश झालो आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली असती,’’ असे नीरजने समाजमाध्यमांवर लिहिले आहे.

४ बाय ४०० मीटर संघात अनासचा समावेश

राष्ट्रीय  विक्रमवीर धावपटू मोहम्मद अनास यहियाचा समावेश राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघात दुखापतग्रस्त धावपटू राजेश रमेशऐवजी करण्यात आला. बुधवारी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने याची माहिती दिली. युजीन येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा ४ बाय ४०० मीटर रिले संघ १२व्या स्थानी राहिल्याने त्यांना अंतिम फेरी गाठता आली नव्हती, त्या संघात मोहम्मद अनासचा समावेश होता.

ज्युदोपटूला सहभागाला हिरवा कंदील

भारतीय ज्युदोपटू जसलीन सिंग याच्यावरील गैरवर्तणुकीचे आरोप दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळले. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘‘उच्च न्यायालयाने जसलीनच्या बाजूने निकाल दिला असून तो आता बर्मिगहॅमला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाऊ शकेल,’’ असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले.

महिलांना पदक जिंकण्याची अधिक संधी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या वेळी पुरुषांपेक्षा अधिक पदके जिंकण्याची संधी महिला खेळाडूंना मिळणार आहे. यात महिलांना १३६ आणि पुरुषांना १३४ सुवर्णपदके जिंकता येतील, तर मिश्र गटाच्या १० सुवर्णपदकांचाही समावेश आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply