“राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित न केल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत एकतर भाजपाचा पराभव होईल किंवा हिंदूत्ववादी शक्ती मोदींना पदावरुन दूर करतील”,” सुब्रमण्यम स्वामींचं मोठं विधान, मोदींना अल्टिमेटम देण्याचं हिंदूत्ववाद्यांना आवाहन

‘राम सेतू’ राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी प्रयत्न करत आहेत. यावर आता स्वामी यांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. “मोदी सरकारने राम सेतूला वारसा स्थळ घोषित न केल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत एकतर भाजपाचा पराभव होईल किंवा हिंदूत्ववादी शक्ती मोदींना पदावरुन दूर करतील”, असे ट्वीट स्वामी यांनी केले आहे. राम सेतूबाबत हिंदूत्ववाद्यांनी पंतप्रधान मोदींना अल्टिमेटम दिलं पाहिजे, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.

‘राम सेतू’चा हा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहे. यासंदर्भात आत्तापर्यंत न्यायालयात १६ वेळा सुनावणी पार पडली आहे. केंद्र सरकारने या मुद्द्यासंदर्भात ठोस पावले उचलले नसल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे.

‘राम सेतू’ हा आदमचा पूल म्हणूनही ओळखला जातो. रामेश्वरमपासून श्रीलंकेच्या वायव्य समुद्रतटापर्यंत ४८ किलोमीटरचा हा चुनखडीचा पूल आहे. हिंदू तसेच मुस्लिम संस्कृतीमध्ये या पूलाचं महत्त्व आहे. हिंदूंची अशी मान्यता आहे की प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करण्यासाठी लंकेत जाण्यासाठी वानरसेनेला हाताशी धरून हा पूल बांधला होता. तर मुस्लीम लोकांची अशी मान्यता आहे की आदमने हा पूल पार केला आणि लंकेतल्या एका शिखरावर प्रायश्चित्त म्हणून तो १००० वर्षे एका पायावर उभा होता. युपीए सरकारच्या काळात ‘सेतूसमुद्रम’ प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ‘राम सेतू’चा मुद्दा मोठ्या वादात सापडला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply