पुणे : फटाक्यांच्या धुराने जिवाशी खेळ! ; श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ; लहान मुले, दम्याचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक हैराण

पुणे : दिवाळीच्या काळात शहरी भागातील हवेचा दर्जा खालावल्याचे चित्र दरवर्षीच दिसते. फटाक्यांच्या धुरामुळे शहरात अनेक श्वसन विकारांना निमंत्रण मिळते, एवढेच नाही तर ज्या रुग्णांना श्वसनविकारांची पार्श्वभूमी, दम्यासारखे त्रास आहेत, त्यांचा त्रासही वाढीस लागल्याचे दिसून येते. नुकत्याच होऊन गेलेल्या दिवाळीनंतर आता ॲलर्जी, ब्राँकायटिस, दमा अशा तक्रारींचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे.दिवाळी आणि सणासुदीला वाजवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे विविध शहरांतील हवेतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून आले आहे. त्याबाबतचा अहवालही सफर या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला आहे. सफरच्या अहवालानुसार पुणे शहरातील हवेची प्रतवारी समाधानकारक या गटात करण्यात आली असली तरी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम शहरातील नागरिकांच्या श्वसनसंस्थेच्या आरोग्यावर लगेच दिसून आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि जनरल फिजिशियन डॉ. मुकुंद पेनूरकर म्हणाले, दिवाळीनंतर हवेतील प्रदूषकांची पातळी वाढते. या हवेत श्वास घेतल्याने मोठ्या प्रमाणात दूषित घटक श्वासावाटे शरीरात घेतले जातात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, दम लागणे ही लक्षणे सर्रास दिसतात. त्याबरोबरीने दमा असलेल्या रुग्णांचा दम्याचा त्रास बळावणे ही लक्षणे सर्वसाधारणपणे दिसून येतात. ब्राँकायटिस, न्यूमोनियाची प्रकरणेही या काळात वाढतात. तशातच थंडी सुरू झाल्यामुळे हवा बदलताना दिसणारे ॲलर्जिक आजारही दिसून येत आहेत. आठवड्याभराच्या औषधोपचारांनी ही लक्षणे नियंत्रणात येतात, मात्र लक्षणांकडे केलेले दुर्लक्ष, अंगावर काढणे यांमुळे प्रकृतीच्या गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते, असेही डॉ. पेनूरकर यांनी स्पष्ट केले.

बालरोगतज्ज्ञांकडे येणाऱ्या लहान मुलांच्या संख्येतही दिवाळीनंतर वाढ झाली आहे. लहान मुलांच्या प्रकृतीसाठी फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाशी थेट संपर्क येणे अजिबात हितावह नाही, मात्र तरीही सर्रास लहान मुलांना फटाके वाजवण्यास प्रवृत्त केले जाते. त्यातून शरीरात जाणाऱ्या धुरामुळे घसा खवखवणे, छातीत जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसतात. बालदमा असलेल्या लहान मुलांनाही फटाक्यांच्या धुराचा त्रास होतो. दिवाळी होऊन गेल्यानंतर साधारण आठवडाभर असे रुग्ण दिसतात, असे निरीक्षण काही तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply