पुणे : प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; तरुणाला वसतिगृहात डांबून मारहाण करणारे तिघे अटकेत

पुणे : प्रेमसंबंधाच्या संशयातून चौघांनी तरुणाचे  राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणाला आंबेगाव परिसरातील एका वसतिगृहात डांबून मारहाण केली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

शुभम विलास पवार (वय २७ रा. लिपाणे वस्ती, दत्तनगर, कात्रज), प्रथमेश महादेव येनपुरे (वय २३), यशराज शिवप्रसाद मिसाळ (वय १८, दोघे रा. काची आळी, रविवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येनपुरे सराईत गुन्हेगार आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम पवार याच्या नात्यातील तरुणी ८ सप्टेंबर रोजी घरातून बेपत्ता झाली होती. तरुणी आणि तक्रारदार तरुण एकमेकांना ओळखतात. दोघे एकाच ठिकाणी कामाला होते. तक्रारदार तरुणाबरोबर नात्यातील तरुणी पळून गेल्याचा संशय आरोपी पवार याला होता.

 पवार आणि त्याचे साथीदार येनपुरे, मिसाळ यांनी मध्यरात्री तक्रारदार तरुणाचे राहत्या घरातून अपहरण केले. जांभुळवाडी परिसरातील एका वसतिगृहात त्याला डांबून ठेवले. त्याला पट्ट्याने  मारहाण केली. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर पवार आणि त्याचे साथीदार पसार झाले. जखमी अवस्थेतील तरुण रुग्णालयात गेला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.

वारजे पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी कात्रज भागात थांबल्याची माहिती मिळाली. सापळा लावून तिघांना  पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, रामेश्वर पार्वे, हनुमंत मासाळ, अमोल राऊत, अजय कामठे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply