पुणे : जि.प. भरती प्रक्रिया रखडलेलीच; तीन वर्षांपासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांकडून संताप ; १३ हजार ५२१ पदे रिक्त

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई : जिल्हा परिषदांतील १३ हजार ५२१ रिक्त पदांची २०१९मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया २०२२मध्येही रखडलेलीच आहे.  तीन वर्षांपूर्वी याकरीता घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी २० लाख उमेदवारांनी पाच ते सात हजार रुपये अर्जापोटी भरले. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील उमेदवार परीक्षा होण्याची वाट पाहत आहेत. असे असताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भरती प्रक्रियाच रद्द केली असल्याबाबतची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांतून फिरू लागल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांना केवळ सत्ता दिसते, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते, पण नोकरीसाठी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार दिसत नाहीत का, जिल्हा परिषद भरती सातत्याने का पुढे ढकलली जाते, असा संताप उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.

सामान्य प्रशासन विभागाने २६ ऑगस्ट रोजी शासन निर्णयाद्वारे कालबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचे वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात खासगी कंपनीची निवड करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आणि निकाल, नियुक्ती प्रक्रिया राबवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. या वेळापत्रकामुळे परीक्षा होण्याची आशा उमेदवारांमध्ये निर्माण झाली. मात्र काही दिवसांपूर्वी त्या वेळापत्रकालाही स्थगिती देण्यात आली. आता भरती प्रक्रिया कधी होणार याबाबत काहीही स्पष्टता नाही. कधी अर्जदारांची माहिती गोळा करणे, कधी अन्य परीक्षांचे कारण देत आतापर्यंत तीन वेळा ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यातच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि स्पर्धा परीक्षार्थी यांच्यातील जिल्हा परिषद भरतीबाबतच्या दूरध्वनी संवादाची कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांत फिरू लागल्याने उमेदवार अधिकच संतप्त झाले आहेत.

तुकाराम नाटकर या उमेदवाराने वेगवेगळय़ा जिल्हा परिषदांमध्ये चार-पाच पदांसाठी २०१९ मध्ये अर्ज केला. त्यासाठी पाच-सात हजार रुपये परीक्षा शुल्क भरले. माझे आई-वडील कोरडवाहू शेतकरी आहेत. आता त्यांना शेतीचे कामही झेपत नाही. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. नोकरी मिळण्यासाठी जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला, पण तीन वर्षांत परीक्षाच झालेली नाही. राज्यातील सरकारे बदलली, पण परीक्षेचा पत्ताच नाही. वय वाढत चालले आहे. माझ्यासारखे लाखो उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषद भरती परीक्षा व्हायला हवी. परीक्षा होत नसल्याने आता नैराश्याची भावना वाढत आहे. माझ्यासारख्या उमेदवारांनी करायचे काय, असा उद्विग्न प्रश्न तुकारामने विचारला.

जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला, तेव्हा माझे वय २४ वर्षे होते, आता मी २८ वर्षांचा आहे. वय वाढते आहे, पण परीक्षा काही होत नाही. या भरती प्रक्रियेत तीन पदांसाठी अर्ज केला होता. या अर्जासाठी भरलेले अडीच हजार रुपये अडकले आहेत. परीक्षा होईल या आशेवर आजपर्यंत वाट पाहिली. साडेतीन वर्षांत परीक्षेबाबत मार्ग निघाला नाही. माझे आईवडील शेतकरी आहेत. मी अजूनही बेरोजगार आहे. पण परीक्षेची वाट पाहण्याशिवाय पर्यायही नाही, असे अजय खोजे या उमेदवाराने सांगितले.

जिल्हा परिषद भरतीमध्ये पाच पदांसाठी अर्ज भरला होता. त्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क भरले. आतापर्यंत तीन वेळा भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. परीक्षा होईल या आशेने तयारी करत आहोत. परीक्षा का होत नाही याचे उत्तरही मिळत नाही. आई वडील शेती करतात. परीक्षा कधी होईल याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. काय करावे हे कळत नाही. मंत्री-प्रशासनाशी संपर्क साधला तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे एका उमेदवाराने सांगितले.

‘गेली तीन-साडेतीन वर्षे अभ्यास करत आहोत. आज परीक्षा होईल, उद्या परीक्षा होईल, अशी आश्वासने मिळतात. होत काहीच नाही. २०१९ मध्ये १३ हजार ५१२ विविध पदांसाठी २० लाखांहून अधिक मुलांनी अर्ज भरले.  पण सरकारला परीक्षा काही घेता आली नाही. परिणामी मान खाली घालून अभ्यास करण्यापलीकडे आमच्या हाती काही राहिले नाही’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया राधाकिशन बडे या विद्यार्थ्यांने दिली.

राजीनाम्याची मागणी

कथित ध्वनिफितीतील अर्वाच्य भाषेविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विटरद्वारे हल्ला चढवत महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले, की २०१९मध्ये सुरू केलेल्या भरती प्रक्रियेतील परीक्षा २०२२मध्येही होत नसल्याने विद्यार्थी नैराश्यात आहेत. गिरीश महाजनांचे बेरोजगारांसोबतच्या अशोभनीय वर्तनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांना मंत्री पदावर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.

नेमके झाले काय?

लाखो उमेदवारांनी परीक्षा अर्ज आणि शुल्क भरले. २०१९ ते २०२२ या कालावधीत राज्यात दोन वेळा सत्तांतर झाले, पण परीक्षा झाली नाही. अर्जाच्या चलनापोटी महापोर्टलवर २५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर पसरल्यामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

कथित ध्वनिफितीत काय? एक विद्यार्थी दूरध्वनी करून ‘झेडपीची फाइल तुमच्याकडे आली असून, ती पाठवा ना साहेब. मुले खूप तणावग्रस्त परिस्थितीत आहेत.’ त्यावर समोरील व्यक्ती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन असल्याचा आरोप केला जात आहे. ते म्हणतात, ‘तुम्हाला काही कामे नाहीत का रे? दिवसभरातून पाचशे फोन लावता, मी काही करत नाही, ती रद्द झाली.’ त्यावर विद्यार्थी म्हणतो, ‘अहो साहेब, मुले डिप्रेशनमध्ये आहेत.’ त्यावर पुन्हा समोरून ‘रद्द केली ती भरती. ठेव फोन’ असे सांगितले जाते.

उमेदवारांचे म्हणणे..

  • जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत उमेदवारांनी वेगवेगळय़ा पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यासाठी दोन-अडीच हजार रुपयांपासून सात-आठ हजार रुपयांपर्यंत शुल्क भरले आहे.
  • परीक्षा होत नसल्याने उमेदवारांसे पैसेही अडकले आहेत. आम्ही परीक्षा अर्जासाठी भरलेले पैसे सरकारने वापरले, पण आमच्या परीक्षांचे काय.
  • गरीब गरजू उमेदवारांची सहनशीलता आता संपली आहे, अशा शब्दांत उमेदवारांनी संताप व्यक्त केला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply