‘एक गाव एक होळी’,जूचंद्र गावाला १२५ वर्षांची परंपरा

वसई तालुक्यातील जूचंद्र  गावात परंपरा जपताना सामाजिक एकोप्याचेही भान जपले जाते. त्याचेच फलित म्हणजे येथील ग्रामस्थ गेली १२५ वर्षे `एक गाव एक होळी` सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल या ठिकाणी पाहावयाला मिळते, ती यंदाही अनुभवता येणार आहे. जूचंद्रचे ग्रामस्थ निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांना पसंती देत असले तरी होळीला सर्वांचे एकमत असते. प्रत्येक जण हिरीरीने सहभाग घेत बहारदार होळी कशी साजरी होईल, याकडे लक्ष देतो. त्यामुळेच जूचंद्र गाव होळी सणाला रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघते. जूचंद्र हे सुमारे ३० हजार लोकवस्तीचे गाव नायगाव पूर्वेला वसले आहे. कलाकारांचे, त्याचबरोबर रांगोळीचे गाव म्हणूनही या गावाची ख्याती आहे. नाटककार, गायक, कवी, लेखक, विविध राजकीय क्षेत्रांतील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते उदयास आले आहेत. या गावात होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विशेष म्हणजे एवढी लोकसंख्या असूनही `एक गाव एक होळी`ची परंपरा आजही या गावाने जपली आहे. होळी उत्सवात तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. नवविवाहित जोडप्यांना होळीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मान दिला जातो. तसेच गावातील ज्या मुली लग्न होऊन सासरी जातात, त्या होळीच्या दिवशी माहेरी येऊन आनंद द्विगुणित करतात. कोंबड होळी व मोठी होळी असे होलिकोत्सवाचे स्वरूप असते. यावेळी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन सर्व गुण्यागोविंदाने नांदो, सुदृढ आरोग्य लाभो, अशी प्रार्थना करतात. जूचंद्र गावात यंदाच्या होलिकोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी होळीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १५ मार्चला विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावेळी आकर्षक बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. गुरुवारी (ता. १७) सायंकाळी ७ वाजता नृत्याविष्कार, नाट्यछटा यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. जूचंद्र धार्मिक सेवा संस्थेच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. होळीनिमित्त गाव एकत्र येते. त्यामुळे सामाजिक एकोप्याचे दर्शन होत असते. गावातील ज्येष्ठांपासून ते लहान मुलांचा सहभाग, आनंद पाहण्यासारखा असतो. ग्रामस्थांना एकाच छताखाली आणण्याचे कार्य पूर्वजांनी केले व एक गाव एक होळी संकल्पना प्रत्यक्षात आणली. तीच परंपरा जूचंद्रमध्ये आजूनही जपली जात आहे. - विनय पाटील, ग्रामस्थ, जूचंद्र.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply