Pune News : भाटघर धरणाजवळ नीरा नदीच्या पाण्यात तरूणी बुडाली

भोर(पुणे) : येथील भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या वेळवंडी व नीरा नदीच्या संगमाजवळ खटाव (जि.सातारा) येथील तरूणी बुडाली. सोमवारी (ता.३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी निगुडघर (ता. भोर) येथील तरुण आणि संबंधीत तरुणी हे दोघे भाटघर धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला पॉवर हाऊसच्या जवळ नदीच्या कडेला पाण्यात पाय सोडून दोघेही बसले होते. त्यावेळी मुलीचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली.

धरणातून पाणी सोडले असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेली. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास यश आले नाही. संबंधीत तरुणाने भोर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना खबर दिली. भाटघर धरणाशेजारील घटनास्थळ हे शिरवळ (ता.खंडाळा, जि.सातारा) यांच्या हद्दीत येत असल्यामुळे भोर पोलिसांनी शिरवळ पोलिसांना कळविले. त्यानंतर भोरचे पोलिस, भोरमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान हे शिरवळ पोलिसांसमवेत संबंधीत तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *