Pune News : पुणे जिल्ह्यात सापडले १५० बेवारस रस्ते; पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर झेडपीतर्फे शोध मोहीम

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे १५० रस्त्यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षात या रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी, खडीकरण, डांबरीकरण किंवा साधा मुरूम टाकण्याचे एकही काम झालेले नाही. यासाठी कोण्या लोकप्रतिनिधीने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यानेही काम करण्याची शिफारस केली नसल्याचे उघडकीस आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.

ग्रामीण भागात तीन प्रकारचे रस्ते असतात. यामध्ये प्रजिमा (प्रमुख जिल्हा मार्ग), इजिमा (इतर जिल्हा मार्ग) आणि ग्रामीण रस्ते (व्हिलेज रोड) असे तीन प्रकारचे रस्ते असतात. प्रमुख जिल्हा मार्ग म्हणजे एका तालुक्याचे ठिकाण दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारे, मोठ्या गावांना किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणारे रस्ते हे प्रमुख जिल्हा मार्ग असतात.

प्रमुख जिल्हा मार्ग वगळून तालुकांतर्गत विविध गावांना जोडणारे मोठे रस्ते हे इतर जिल्हा मार्ग असतात आणि इतर जिल्हा मार्गापासून गाव किंवा वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांना ग्रामीण रस्ते किंवा गाव रस्ते म्हणतात. असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांची कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात. इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची कामे ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जातात. यामध्ये नवीन रस्त्यांची निर्मिती करणे, कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करणे, पक्का रस्ता करण्यासाठी रस्त्याचे खडीकरण,

डांबरीकरण करणे, किंवा केवळ मुरूम टाकून रस्त्याचे सपाटीकरण करणे, आदी कामे केली जातात. याशिवाय पूर्वी खडीकरण किंवा डांबरीकरण केलेले रस्ते खराब झाले असल्यास, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यास, अशा रस्त्यांची दुरुस्ती केली जाते किंवा खड्डे बुजविले जातात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत दरवर्षी नियमितपणे ही कामे केली जातात.

दरम्यान, या रस्त्यांची नवीन किंवा डागडुजीची कामे असोत, यासाठी कोणी ना कोणी लोकप्रतिनिधी शिफारस करत असतो. मग कधी खासदार, कधी आमदार, कधी जिल्हा परिषद अघ्यक्ष, तर कधी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य,

पंचायत समिती सदस्य आदी लोकप्रतिनिधी ही शिफारस करत असतात. ज्या रस्त्यांच्या कामांची कोणीच शिफारस करत नाहीत, अशा रस्त्यांची कामे संबंधित विभागांचे अधिकारी स्वतःहून कृती आराखडे तयार करत असतात. परंतु या १५० रस्त्यांची ना कोणत्याही लोकप्रतिनिधीने, ना कोणत्याही विभागाने, ना कोणत्याही अधिकाऱ्याने साधी शिफारसच केली नसल्याचे आढळून आले आहे.

 

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सापडले रस्ते

जिल्ह्यातील किती रस्त्यांच्या कामांची आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने किंवा अधिकाऱ्याने शिफारस केलेली नाही, अशा रस्त्यांची संख्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागितली होती. परंतु अशी काही नोंद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर अशा रस्त्यांचा शोध घेण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला. या आदेशानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक तालुक्यात सरासरी १५ ते १७ रस्ते सापडले आहेत.

पुणे जिल्हा संक्षिप्त माहिती

  • पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ --- १५ हजार ६६४ चौरस किलोमीटर

  • जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या --- १३

  • जिल्ह्यातील एकूण महसुली गावे --- १८७८

  • एकूण ग्रामपंचायती --- १४०७

  • जिल्ह्यातील ग्रामीण घरांची संख्या --- ६ लाख २५ हजार ४२३

  • इतर जिल्हा मार्गांचे एकूण अंतर --- १ हजार ८७५ किलोमीटर

  • ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी --- ९ हजार ६३९ किलोमीटर



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply