Pune News : गाव वसले पण गावपण हरवले, पुण्यातील माळीणवासीयांचा जुन्या आठवणींना उजाळा; म्हणाले...

Pune  : डोंगरकडा कोसळून माळीण गाव राड्यारोड्यात गाडले गेल्यानंतर तीन वर्षांनी माळीणवासीयांचे नवीन ठिकाणी पुनवर्सन झाले. चांगली व सुरक्षित घरे उभी राहिली. जीवाला जीव देणारी माणसे दुर्घटनेत मृत्यू पावली. आता गावांत माणसेही मोजकीच असून, घरांमधील भौगोलिक अंतरही वाढले आहे. गाव नव्याने वसले; पण गावपणच हरवले आहे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

३० जुलै २०१४ या दिवशी सकाळी दरड कोसळली आणि माळीण गाव राड्यारोड्याखाली गाडले गेले. सुमारे ५० घरे असलेल्या या गावातील १५१ नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. बचावलेल्या नागरिकांचे माळीण फाटा येथील एका शाळेच्या आवारात तात्पुरते स्थलांतर केले होते. जिल्हा प्रशासनाने माळीण गाव वसविण्यासाठी जवळच्या आमडे गावातील जागा निश्चित करून काम सुरू केले होते. तीन वर्षांत ते काम पूर्ण झाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवीन गावातील घरांचे लोकार्पण करण्यात आले.

CM Eknath Shinde: विधानसभेसाठी CM शिंदेंचं खास मिशन, भाजपचं वाढलं टेन्शन; मोर्चेबांधणी सुरु, घमासान होणार

माळीण दुर्घटनेला आज, १० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर माळीण गावात जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला असता, दुर्घटनेमुळे त्यांच्या मनावर झालेल्या जखमा आजही कायम असल्याचे दिसले. नवीन गाव, घरे चांगली आहेत; पण आमची माणसेच सोबत नसल्याने या गावात गावपण नाही, अशी त्यांची भावना आहे.

या दुर्घटनेत गोरख पोटे यांची पत्नी, आई आणि चार मुलांचे निधन झाले. पोटे एकटेच बचावले होते. माळीण दुर्घटना आणि पुनवर्सन याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘गावाला पहिल्यासारखे रूप आलेले नाही. शहरासारखी प्रत्येकाची भिंत वेगळी, चूल वेगळी झाली आहे. जुन्या गावात घराला लागून घरे होती. प्रत्येकाच्या सुख, दु:खात गाव सहभागी होत होता. आता घरे काही ठरावीक अंतरावर आहेत. त्यातच अनेक घरे कुलूपबंद आहेत. त्यामुळे गाव रिकामे वाटते.’

आता चित्र बदलले’

‘दुर्घटना घडली, त्या वेळी गावात पारावर होतो. त्यामुळे मी आणि वडील वाचलो; पण आई, भाऊ, बहीण आणि बहिणीची तीन मुले मृत्यू पावली. सरकारने आता नवीन गाव वसवले आहे. मात्र, आमचे गावच चांगले होते. नवीन गावात लोकांचा संपर्क कमी झाला आहे. काही कार्यक्रम असेल, तरच लोक एकत्र येतात. जुन्या गावात समाज मंडळाचे ऑफिस होते. तेथे दररोज ग्रामस्थ फेरफटका मारायचे. त्यामुळे संवाद होत होता. आता ते चित्र बदलले आहे,’ अशी भावना मच्छिंद्र दांगट या तरुणाने व्यक्त केली.

पूर पाहायलो गेलो; म्हणून वाचलो

माळीण दुर्घटनेवेळी घराबाहेर असलेले लोक बचावले. त्यात मंगलदास विरणक (५५ वर्षे) यांचा समावेश आहे. त्या दिवशी खूप पाऊस झाला होता. बुब्रा नदीला पूर आला होता. नदीचे पाणी पुलावरून जात होते. ते पाहायला म्हणून घराबाहेर पडलो आणि मागे एका मिनिटात गावावर दरड कोसळली. कोणाला हालचाल करायचीही वेळ मिळाली नाही. या दुर्घटनेत माझी आई, पत्नी आणि मुलाचे निधन झाले. एक मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होता आणि दोन मुलींचा विवाह झाला असून, त्या सासरी होत्या. आता गावी मी एकटाच असतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply