Pune : पुण्यातील कसबा मतदारसंघापासून इंदूर पॅटर्नची होणार सुरुवात, पुणे महापालिकेचे आयुक्त थेट इंदूरमध्ये

Pune : मध्य प्रदेशचे इंदूर हे शहर सलग सात वेळा स्वच्छ सर्वेक्षणात भारतातील पहिला क्रमांक मिळवणारे एकमेव शहर आहे. या शहराने असा काय केलं आणि इथले नागरिकांनी प्रशासनाला कसा हातभार लावला आहे हे पाहण्यासाठी पुण्यातील ३०० जणांच्या शिष्टमंडळाने इंदूरला भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मतदारसंघात सर्वोत्तम विकासकामे करण्यासाठी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला दिला होता. याचनिमित्ताने स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांचे शिष्टमंडळ यांनी २ दिवसाचा इंदूर दौरा केला.

पहिल्या दिवशी या शिष्टमंडळाने इंदूरमधील नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हर एन्विरो बायोगॅस या कचरा पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) प्रकल्पास भेट दिली. यावेळी पुणे महापालिकेच्या अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांनी तसेच कचऱ्याचे विघटन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उपयुक्त गोष्टी याची प्रक्रिया समजून घेतली.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या शिष्टमंडळाने इंदूरचे महापालिका आयुक्त शिवम वर्मा आणि अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली. घरोघरी जाऊन पालिकेचे कर्मचारी कचरा कसा गोळा करतात, कचऱ्याचे वर्गीकरण कसं केलं जातं, सफाई कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कसे नियंत्रण ठेवले जाते, स्वच्छतेच्या बाबत इतर महत्त्वाच्या घटकांबाबत सुद्धा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

पुणे महापालिकेचे आयुक्त थेट इंदूरमध्ये

पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये जात कचरा गोळा करणे, कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि वर्गीकरण यासारख्या गोष्टींचा आढावा घेतला. सलग ७ वर्षांपासून भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरला मान मिळतोय. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांचे शिष्टमंडळ सुद्धा यावेळी आयुक्तांच्या सोबत होते. माध्यमांशी संवाद साधताना, भोसले म्हणाले, "इंदूर महापालिकेने लोकांमध्ये जाऊन कचऱ्याच्या बाबत एक प्रबोधन केलं आहे. घराघरातील कचऱ्याचे ६ भागात वर्गीकरण केलं जातं. यावर दंडात्मक कारवाई आहे पण तत्पूर्वी इथल्या प्रशासनाने तेवढी सेवा सुद्धा तत्परतेने दिली आहे. इंदूर मॉडेलचा आढावा घेऊन त्याचा फक्त अहवाल येऊन पडेल असं होणार नाही पण त्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय."

Pune Crime : नोकरी जाण्याची भिती, आचाऱ्याने दुसर्‍या आचाऱ्याचा चाकूने गळा कापला, पुण्यात भरदिवसा हत्या

कचऱ्याच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रूम

इंदूर शहरात इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत एक कमांड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी शहरातील ४७० पेक्षा अधिक वाहनांवर एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. २५ पेक्षा अधिक कर्मचारी या कमांड सेंटरमध्ये काम करतात. काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला प्रत्येक व्हॅनचा मार्ग माहित असतो. गाडीचा वाहक कोण आहे, ती व्हॅन नेमकी कधी थांबते, कचरा गोळा करायला किती वेळ लावते तसेच ती गाडी वेळेत पोहचली आहे का अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वाहनाला जी पी एस ट्रॅकर बसवले आहेत. २०१८ मध्ये हे कमांड सेंटर काम सुरू झाले. कोणत्याही मार्गावर बिघाड, रस्ता बंद असल्यास किंवा चालकाची तब्येत ठिक नसल्यास याबाबत सुद्धा माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळते

इंदूर शहरात दररोज स्वच्छतेचे सर्वेक्षण

महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच इंदूर सलग ७ वेळा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे, असं प्रतिपादन इंदूरचे महापालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी केलं आहे. वर्मा म्हणाले, "शहरातील प्रत्येक घरातून कचऱ्याचे वर्गीकरण केलं जातं त्यानंतर ते गोळा होऊन पुढे त्या त्या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये जाऊन त्यावर कार्यवाही केली जाते. फक्त शहरातच नव्हे तर अगदी झोपडपट्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने नागरिकांची कचऱ्याबद्दल भूमिका स्पष्ट आहे." "शहर स्वच्छ राहावे यासाठी जसे अनेक संस्था सर्वेक्षण करतात तसं आमच्याकडून दररोज शहराचे सर्वेक्षण केलं जातं. फक्त कचऱ्याचे नाही तर रस्त्यावर सुशोभिकरण, समाज प्रबोधन याबाबत अनेक उपायोजना आम्ही राबवतो," असं ही ते म्हणाले. रस्त्यांवर थुंकणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक महिन्याला ३ लाख रुपये दंड वसूल केला जात असल्याची माहिती सुद्धा आयुक्तांनी यावेळी दिली.

पुण्यातील कसबा मतदारसंघापासून इंदूर पॅटर्नची सुरुवात

इंदूरची स्वच्छता त्याबरोबरच येथील नागरिकांचा या मोहिमेत यात असलेला सहभाग या शिष्टमंडळाने अनुभवला. रोल मॉडेल म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघात इंदूर पॅटर्नची सुरुवात लवकरच होईल. या पॅटर्न बद्दल सातत्याने आम्ही पुढाकार घेऊन आपण जो प्रयत्न केला जो संकल्प केला आहे त्याला सिद्धीस आणणार आहोत, पुढील तीन ते चार महिन्यात याची अंमलबजावणी होईल याच्याशी आम्ही प्रयत्नशील आहोत असा विश्वास आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply