Pune : उद्योगनगरीला गुन्हेगारीचा विळखा

Pune : सराईत गुन्हेगाराकडून माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून हॉटेलमध्ये गोळीबार, सराइताकडूनच मॉलसमोर गोळीबार, रिक्षात, खाणीत ढकलून देत, गळा दाबून, दगडाने ठेचून, चाकूने गळा चिरून झोपेतच खून, वाहनांची तोडफोड, कोयता नाचवत दहशत, कोयत्याचा धाक दाखवून विनयभंग या मागील आठवड्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील घटना पाहिल्यानंतर उद्योगनगरीची गुन्हेगारनगरीकडे वाटचाल होऊ लागली की काय? अशी भीती शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीत होत असलेली वाढ रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत १८ पोलीस ठाणे येतात. आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ ११५ चौरस किमी इतके असून अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी- मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. कारखानदारीमुळे शहराची उद्योग, कामगारनगरी अशी ओळख झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक शहरात उदरनिर्वासाठी स्थायिक होतात. त्यामुळे येथे झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे गुन्हेगारीतही वाढ होताना दिसत आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊन सहा वर्षे उलटले. परंतु, गुन्हेगारी कमी करण्यात अपयश आल्याचे दिसते. त्याउलट दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे.

Pune : सोसायटीतील गणेशोत्सवात महिलांचा विनयभंग, लोणीकंद पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

मागील आठ दिवसांत गोळीबाराच्या दोन आणि खुनाच्या पाच घटना घडल्या. काळेवाडीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला. पोलिसांनी केवळ चौकशी करून नगरसेवकाला सोडले आणि सराइतालाही तत्काळ जामीन मिळाला. माथाडीचे काम मिळण्याच्या वादातून आणि दहशत माजविण्यासाठी सराईत गुन्हेगाराने वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केला. काळेवाडी, बावधन, खेड, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी अशा खुनाच्या पाच घटना घडल्या. पिंपळे गुरव व नवी सांगवीत दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली. एवढेच नाही तर पत्ता सांगितला नाही म्हणून गतिमंद तरुणावर कोयत्याने वार केले. आरोपी तत्काळ पकडले जात आहेत. परंतु, गुन्हे घटत नाहीत. त्यात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरांवरही गुन्हे घडताना दिसतात. गुन्हेगार पोलिसांनाही जुमानत नाहीत. पोलिसांचे वर्चस्व, धाक, भीती राहिल्याचे दिसून येत नाही. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना एक, दोन वर्षांसाठी हद्दीतून तडीपार केले जाते. मात्र, ही कारवाई ‘कागदावरच’ राहत असून तडीपारांचा शहरात वावर असल्याचे दिसून येते. अनेक गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचेही समोर येत आहे. बेकायदेशीरपणे पिस्तुलांचा वापर वाढला आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

निरीक्षकांच्या सतत बदल्या कशासाठी?

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सतत बदल्या केल्या जातात. पोलीस निरीक्षकाला पदभार स्वीकारल्यानंतर हद्द, गुन्हेगारांची माहिती होण्यासाठी चार ते पाच महिने लागतात. तोपर्यंत दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदली झालेली असते. हद्दीची माहिती होईपर्यंत बदली होत असल्याने गुन्हेगारी रोखण्यात अपयश येताना दिसत आहे. बदल्यांमुळे अधिकाऱ्यांची मक्तेदारी होत नसली तरी चार महिन्यांतच बदली नेमकी कशासाठी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply